नागपूर: मुलगा, बहिणीसह ५ जणांची हत्या; क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशी कायम | पुढारी

नागपूर: मुलगा, बहिणीसह ५ जणांची हत्या; क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशी कायम

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : स्वत:चा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू अशा पाच जणांची निर्दयीपणे हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ४०) याची मरेपर्यंत फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी (दि.२७) कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला आहे.

कृष्णा विवेक पालटकर (५), अर्चना कमलाकर पवनकर (४५), कमलाकर मोतीराम पवनकर (४८), वेदांती कमलाकर पवनकर (१२) व मीराबाई पवनकर (७३) अशी मृतांची नावे आहेत. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे वास्तव्यास होते. १५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने पालटकरला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत मरेपर्यंत फाशी व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पालटकरने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले त्यावर १८ डिसेंबर २०२३ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली. निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पालटकरचे अपील फेटाळून लावले. सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे, फिर्यादी केशव पवनकरतर्फे ॲड. मो. अतिक तर, आरोपीतर्फे ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी युक्तिवाद केला.

अशी घडली होती घटना

क्रूरकर्मा पालटकरला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर हे पालटकरकडे पैसे परत मागत होते. पालटकर नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नसल्याने त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या आठ दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे पालटकरने कमलाकर व इतरांना कायमचे संपविण्याचा कट आखला.

त्यानुसार, तो ११ जून २०१८ रोजी रात्री दहाच्या सुमारास कमलाकर यांच्या घरी गेला. या सर्वांनी सोबत जेवण केले. त्यानंतर घराच्या हॉलमध्ये पालटकर व मीराबाई झोपल्या. बेडरुममध्ये कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा झोपले. पालटकरची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) दुसऱ्या खोलीत झोपल्या.

मध्यरात्री एकच्या सुमारास पालटकर उठला. त्याने सैतानासारखे कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा यांच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने जबर वार केला. त्यामुळे चौघांचाही बेडवरच मृत्यू झाला. दरम्यान, आवाज ऐकून मीराबाई बेडरुमकडे धावल्या असता पालटकरने त्यांना पकडून स्वयंपाकघरात नेले व डोक्यावर वार करून ठार मारले. त्यानंतर तो लोखंडी गेटवरून खाली उडी मारून पसार झाला. या हत्याकांडात वैष्णवी व मिताली सुदैवाने बचावल्या होत्या.

हेही वाचा 

Back to top button