नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यांतर्गत उमरेड-नागपूर रोडवर पारधी वस्ती तांड्यावर होळीच्या आनंदोत्सवात धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा वाद दोन गटात नव्हे तर एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये असल्याचे उघड झाले.
संबंधित बातम्या
सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ असल्याने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ही एकच कुटुंबातील बाब असल्याचे सांगत संबंधितांनी असे काही झालेच नसल्याचे सांगितले. या संदर्भात दोन्ही बाजूने कुठलीही तक्रार पोलिसात करण्यात आलेली नसल्याची माहिती उमरेड पोलिसांनी दिली.
होळी धुलिवंदनचा जल्लोष सर्वत्र सुरू असताना सोमवारी (दि. २५ ) रोजी दुपारनंतर ही घटना घडली. दरम्यान या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. होळी खेळण्यासाठी बाहेरून काही पाहुणे या तांड्यावर आल्यामुळे हा वाद चिघळला. मात्र, आई, भाऊ आणि चुलत भाऊ असा हा कौटुंबिक वाद असल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांचाही नाईलाज झाला.