

Motor Accident Claims Tribunal Scam
नागपूर : एकीकडे भरधाव ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांच्या वाढत्या अपघातांनी प्रवाशांची, सर्वसामान्यांची चिंता वाढलेली असताना आता मोटार अपघात दावा न्याया धिकरणात 45 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका वकिलाला अटक केली आहे. महेश मासुरकर (वय 48, रा. दाभा) असे या अटकेतील वकिलाचे नाव आहे.
विशेष म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी आतापर्यंत या संदर्भात 11 गुन्हे दाखल केले आहेत. मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात एकीकडे वर्षानुवर्षे संबंधित व्यक्ती, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नसताना मृत व्यक्तींच्या नावाने या मंडळींनी पैशाचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार लिपिक दिगंबर ढेरे हा आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावे अपघातातील विम्याची रक्कम कोषागारात जमा केली जाते. ढेरे यांनी साथीदारांच्या मदतीने बनावट दस्तऐवज तयार करून 45 कोटींपेक्षा अधिकची रक्कम परस्पर आपल्या नातेवाईकांचे व साथीदारांच्या खात्यात वळती केल्याचा हा प्रकार या निमित्ताने आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे.