

37 billion dollar economy through women's self-help groups : Smriti Irani
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
देशांतर्गत ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या महिला बचत गटांची अर्थव्यवस्था 37 बिलियन डॉलरवर पोहोचली असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. कॅट अर्थात कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे आयोजित व्यापारी संवादात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, महिला आघाडी पदाधिकारी दिपाली पचौरी, ज्योती अवस्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
व्यापाऱ्यांशी संवाद साधताना भाजप नेत्या स्मृती इराणी म्हणाल्या, भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. नंबर एकचे स्वप्न असून ही अर्थव्यवस्था होण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत महिलांनी देखील व्यापार उद्योगात मोलाचे योगदान देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गट जर 37 बिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारू शकतात तर शहरी भागातील महिलांनी यापेक्षा मोठे योगदान देणे सहज शक्य आहे.
मुद्रा लोनच्या लाभार्थ्यांमध्ये 70 टक्के तर स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्यात 80 टक्के महिलांचा समावेश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विशेषता अडीच टक्के पुरुषांचे प्रमाण तर महिला उद्योजक व्यापाऱ्यांचे एनपीए प्रमाण दोन टक्के पेक्षा कमी असल्यावर त्यांनी भर दिला.
महिलांमध्ये केवळ आत्मविश्वासाची उणीव आहे. त्यामुळे त्या कुठलाही व्यापार व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, अपयश आल्यास काय होईल याचाच अधिक विचार करतात.
मात्र महिलांनी खचून न जाता अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक करताना कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांमुळे पारंपारिक व्यापाऱ्यांना होणारा तोटा लक्षात घेता सरकारी निश्चित धोरण करायला हवे असे सांगितले.