नागपूर : खिडकीचे ग्रील तोडून लाखोंचे हिरेजडित दागिने लांबवले

नागपूर : खिडकीचे ग्रील तोडून लाखोंचे हिरेजडित दागिने लांबवले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : कुवेतला व्यवस्थापक असलेल्या बाथो कुटुंबियांना चोरट्याने चांगलाच गंडा घातला. देव दर्शनासाठी शेगावला गेलेल्या बाथो यांचे घर फोडून चोरट्यांनी हिरे जडीत दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरटे खिडकीची ग्रील तोडून घरात घुसल्याची घटना सोनेगाव ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी लक्ष्मीनारायण किशोर बाथो (वय 54, रा. पॅराडाईज हाऊसिंग सोसायटी) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मात्र, आरोपींचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. लक्ष्मीनारायण बाथो हे कुवेतच्या एका कंपनीत व्यवस्थापक होते. जानेवारी महिन्यात ते नोकरी सोडून भारतात परत आल्यानंतर ते पॅराडाईज सेासायटीत आई-वडिलांसह राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. शनिवारी सकाळी बाथो कुटुंब घराला कुलूप लावून गजानन महाराजांचे दर्शन करण्यासाठी शेगावला गेले होते. हीच संधी साधून अज्ञात आरोपींनी खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. बेडरुमच्या कपाटामध्ये एका डब्यात दागिने ठेवले होते. चोरांनी रोख 20 हजार रुपये, सोन्याचे हिरे जडीत दागिने, कंठीहारसह 85 लाख रुपयांचा माल चोरून नेला.

बाथो कुटुंब घरी परतले असता सर्व सामान अस्त-व्यस्त पडून होते. खिडकीची ग्रील तुटलेली होती. कपाट उघडे होते आणि डब्यातील दागिने गायब होते. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोनेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी येऊन तपास सुरू केला.
दरम्यान, 20 तोळे सोन्याचा एक हार आरोपींनी घरीच सोडला होता. बहुतांश सोने कुवेत येथून खरेदी करण्यात आले होते. बाथोच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, मात्र जवळच्याच एका घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली असता शनिवारी रात्री 1.30 च्या सुमारास दोन संशयित आरोपी दुचाकीने येताना आणि जाताना दिसत आहेत. अंधार असल्याने त्यांचे चेहरे आणि दुचाकीचा नंबर दिसला नाही. पोलीस आसपासच्या परिसरातही चौकशी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news