नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वीस तासांपेक्षा जास्त वेळ अॅम्बू बॅगद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास आणि अखेरपर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने यवतमाळमधील एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लेकीचा मृत्यू झाला, असा आरोप मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १७ वर्षीय वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी उपचारांसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. मात्र, व्हेंटिलेंटर उपलब्ध नाही असे कारण देत तिथल्या डॉक्टरांनी तब्बल २० तासांपेक्षा जास्त वेळ तिला अॅम्बू बॅगद्वारे कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले होते. धक्कादायक म्हणजे हे काम आजारी तरुणीच्या आई-वडिलांना करावे लावले होते. २० तासांपेक्षा जास्त काळ तिच्या आई-वडीलांनी अॅम्बू बॅग द्वारे आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेर त्यांची धडपड व्यर्थ ठरली आणि वैष्णवीला शेवटपर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकला नाही. अखेरीस शनिवारी ( दि.17 सप्टेंबर) तिने जीव सोडला.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वैष्णवी बागेश्वर या तरुणीला पोटाच्या आजाराच्या उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. मात्र तिची प्रकृती बिघडत असल्यामुळे तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. १४ सप्टेंबरच्या रात्री आई-वडील तिला घेऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचले होते. तेव्हा तिची स्थिती गंभीर होती. १५ सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास तिला रुग्णालयातील वॉर्डमध्ये जागा मिळाली. तिच्यावर उपचारही सुरु करण्यात आले. मात्र तिची अवस्था पाहता तिला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र ते तिला मिळू शकलं नाही. त्यामुळे उपस्थित डॉक्टरने तिला काही वेळ कृत्रिम श्वास देण्यासाठी ॲम्बू बॅग लावली. अॅम्बू बॅग एक प्रकारचा फुगा असतो जो वारंवार दाबून रुग्णाला कृत्रिम श्वास देता येतो.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अनेक तास प्रतीक्षा केल्यानंतरही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी तब्बल २० तास वैष्णवीचे आई-वडील अॅम्बू बॅगचा फुगा वारंवार दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते. वैष्णवीचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, अखेरपर्यंत तिला व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही. अॅम्बू बॅग हाताने दाबून दाबून आमची जीव सोडण्याची वेळ आली होती. मात्र आमच्या लेकीला व्हेंटिलेटर मिळालं नाही असं दुःख तिच्या वडिलांनी व्यक्त केलं. तर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लेकीचा जीव गेल्याचे आरोप वैष्णवीच्या नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा