बीड : केज-अंबाजोगाई रोडवर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक; एक ठार
केज : पुढारी वृत्तसेवा; केज-अंबाजोगाई रोडवर प्रवासी कार व मालवाहतुक वाहनाचा समोरा समोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. १७) दुपारी ३:३० च्या दरम्यान केज-अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील हॉटेल निसर्ग येथे घडला. या घटनेत कार मधील प्रवासी महेश अंबादास पेटलपट्टी (वय २७ रा. सोलापूर) यांचा मृत्यू झाला.
या बाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, केज-अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील हॉटेल निसर्ग जवळ अंबाजोगाई कडून केजकडे येणारे मालवाहतुक वाहनाचे (क्र. एमएच-४३ एडी ७२१०) टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी या वाहनाने केजकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या कारला (क्र.एम एच १३ सीके २६१४) समोरासमोर धडक दिली.
या भीषण अपघातात कार मधील प्रवासी महेश अंबादास पेटलपट्टी (वय २७ रा. सोलापूर) यांचा मृत्यू झाला तर व्यंकटेश भुपेंद्र इंगे (वय ४७, रा. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अपघातातील जखमींना नागरिकांनी रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल केले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अपघातस्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला..