

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महानगर पालिका, स्मार्ट सिटी प्रशासनातर्फे लवकरच ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. सरकारच्या अध्यादेशानुसार दिव्यांग बांधवांकडे यासाठी वाहन परवाना नव्हता. ही गरज लक्षात घेता मनपाच्या पुढाकारातू विशेष तपासणी शिबिर झाले. 74 दिव्यांग बांधवाना यावेळी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर त्यांना आता लवकरच परवाना सुपूर्द केला जाणार आहे.
दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनाला गती देता यावी यासाठी मनपाने यापूर्वीही दिव्यांग बांधवांना ई रिक्षाचे वाटप केले. मात्र वाहन परवाना अधिनियमात झालेल्या बदलानुसार ई रिक्षा साठी देखील वाहन परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे जे दिव्यांग बांधव पूर्वी ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, त्यांच्याकडे वाहन परवानाच नसल्याने त्यांना ई रिक्षा बंद कराव्या लागल्या. ही गरज लक्षात घेता मनपाने दिव्यांग बांधवांसाठी मेडिकलच्या पेइंग वॉर्डात भौतिकोपचार विभागाच्या सहकार्याने राबविलेल्या या शिबिरात पहिल्याच दिवशी 74 दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांचे वाहन परवान्यासाठी असेसमेंट करण्यात आले. अधिकृत वाहन परवान्याच्या आधारे दिव्यांग बांधवांना ई रिक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोजगार उपलब्ध होणार आहे.
शहरातील वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटीच्यातीने आणखी 150 दिव्यांगांना ई रिक्षा वाटप केले जाणार आहे. प्रत्येकी 2 लाख रुपये प्रमाणे 3 कोटी रुपये खर्चून मेट्रो स्टेशनजवळ चार्जिंग सुविधांसह ई रिक्षा स्टँड उभारले जाणार आहेत.
हेही वाचा :