आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा रोखली, पोलिसांनी घेतले ताब्यात

आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा रोखली, पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा : क्षारयुक्त, दूषित पाणी टँकरसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरी जाण्यासाठी निघालेली संघर्ष यात्रा अखेर आज नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी रोखली. खाली झोपून, कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन करणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सर्वांना विविध ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांनी अमरावती, अकोल्याच्या दिशेने माघारी पाठविण्यात आले.

नागपूर पोलिसांनी कालच या संघर्ष यात्रेला नागपुरातील आंदोलनाला परवानगी नाकारली होती. अंजनाबाई वानखेडे विद्यालय, वडधामना येथे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह संघर्ष यात्रेत सहभागी कार्यकर्ते मुक्कामी असल्याने पोलीसांनी या शाळेला गराडा घातला व नियोजनपूर्वक हे आंदोलन हाणून पाडले. सकाळी ठाकरे गटातर्फे स्वागतानंतर ही यात्रा पुढे कूच करणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली. ही सरकारची पोलिसांकरवी दडपशाही असून यापुढेही आपला सामान्य जनतेसाठी संघर्ष सुरूच राहील. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडक दिली जाईल असा इशारा आ देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

जिल्ह्यातील बाळापूरचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे मतदारसंघातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाच्या आंदोलनासाठी शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्त्यासह संघर्ष यात्रेच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात पोहचले. अकोला जिल्ह्यातील 69 गावांचा पाणी प्रश्न घेऊन आमदार देशमुख नागपुरात आले. हे पाणी पिण्याच्या योग्य नाही. मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना शिंदे-फडणवीस सरकारने रोखल्याचा आरोप आहे. याच वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार देशमुख थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर गावागावातून गोळा केलेला पाण्याचा टँकर घेऊन पोहोचणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

फडणवीस यांनी हे पाणी पिऊन दाखवावे अशी अटही त्यांनी घातली होती. या यात्रेच्या निमित्ताने आपल्यावर गुन्हे दाखल झाले पण त्यांची पर्वा आपल्याला नाही. पालकमंत्री फडणवीस यांनी गावांच्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानासमोर धडक देणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला असल्याने पोलीस सतर्क होते. नागपूर जिल्ह्यातील अमरावती मार्गावरील वाडी वडधामना हनुमान मंदिर येथे शहर आणि ग्रामीणचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते सकाळी स्वागतासाठी पोहचले होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केल्याने सर्वांचा हिरमोड झाला.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news