लाखो उद्योग बंद, कुठाय मेक इन इंडिया?, के. चंद्रशेखर राव यांचा सवाल

लाखो उद्योग बंद, कुठाय मेक इन इंडिया?, के. चंद्रशेखर राव यांचा सवाल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आज देशात लाखो उद्योग बंद आहेत कुठे आहे मेक इन इंडिया ? गरज नसलेल्या वस्तूंची आयात वाढली आहे. कृषीप्रधान देश असताना एक लाख कोटींवर पामोलींन तेल आयात होत असून हे बंद करा, डाळ कॅनडातून येते, काँग्रेससह भाजपही या सर्व धोरणांना दोषी असून सर्व बुद्धिजीवी, युवकांनी देशात आमूलाग्र गुणवत्ता पूर्ण परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी आता शेती सोबतच लोकसभेत आणि विधानसभेत आपल्या हिताचे कायदे करण्यासाठी जाण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

कार्यालय उदघाटन, पक्ष प्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. आज ज्या वस्तू भारतात निर्माण होऊ शकतात त्या सर्व चीनमधून आणल्या जात आहेत. त्यामुळेच संवैधानिक, आर्थिक, शैक्षणिक आरोग्य विषयक, निवडणूक पद्धती, प्रशासकीय बदल अशा विविधांगी धोरणात्मक बदलाची गरज चंद्रशेखर राव यांनी यावेळी व्यक्त केली. निवडणुका वर्षानुवर्षे होत आहेत एक येतो दुसरा जातो मात्र हे वास्तव बदललेले नाही. मोठ्या प्रमाणात देशात नद्या असताना केवळ एक चतुर्थांश पाणी आपण वापरतो. 75 वर्षात 15 पंतप्रधान देशाने बघितले शेकडो मुख्यमंत्री झाले मात्र धोरणे बदलली नाहीत.

देशात दमदार सरकार असेल तर मोफत वीज, शिक्षण, पाणी घरोघरी पोहोचू शकते. प्रथमच भारतात रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. अर्थस्थिती सुधारली तर सर्व प्रश्न सुटतील. बीआरएस हे चित्र बदलेपर्यंत थांबणार नाही यासाठी निश्चितच कालमर्यादा सांगता येणार नाही मात्र हळूहळू आमच्या भूमिकेशी समरूप सहकारी जुळले जातील.

आज राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात किंवा देशात आमच्यामुळे कोणाचा फायदा कोणाचा तोटा हे आम्ही पाहत नाही. मात्र जनतेचा फायदा निश्चितच होणार आहे. मनपासह प्रत्येक निवडणूक भारत राष्ट्र निर्माण समिती बीआरएस लढणार आहे असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

तेलंगणात 14 राज्यातील लोक उदरनिर्वासाठी आले विदर्भातही पुढे हेच चित्र दिसेल असा दावा केला. स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने मी काल होतो आजही आहे असेही सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असून तेलंगणामधील चांगल्या योजना आम्ही आपसात शेअर करतो अशी कबुली त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात दिली. विकेंद्रीकरणातून प्रशासकीय यंत्रणा गतिमान होते, त्याचा राज्यातील जनतेला फायदाच होतो असे ते म्हणाले. दरम्यान, समान नागरी कायद्यासंदर्भात विचारले असता ज्यावेळी भूमिका सांगण्याची गरज येईल तेव्हा आम्ही ती स्पष्ट करू असे सांगतांना केसीराव यांनी धर्मगुरू मठापुरतेच राहायला हवेत त्यांना राजकारणात आणू नये असा टोला भाजपला लगावला.

विविध तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून होत असलेल्या गैरवापर या संदर्भात बोलताना आज पंतप्रधान मोदी असो वा कोणीही ते देखील एका पक्षातून पुढे आलेले आहेत. त्यामुळे विविध पक्ष राहिले तरच लोकशाही शाबूत राहील यंत्रणांचा दुरुपयोग ही निंदनीय बाब आहे असे स्पष्ट केले. खाजगीकरणाचा देखील त्यांनी विरोध केला.

ईव्हीएमला वाढता विरोध लक्षात घेता विकसित देशांमध्येही सुरुवातीला ईव्हीएमचा मोठ्या प्रमाणात वापर झाला मात्र पुढे तो त्यांनी बंद केला. आज देशात देखील लोकांना याबाबतीत संशय आहे तर तो वापर बंद करायला काय हरकत आहे असे राव म्हणाले. तेलंगणाचे दरडोई उत्पन्न तुलनात्मक दृष्ट्या तेलंगणा 3.17 लाख तर महाराष्ट्र 2.40 लाख याप्रमाणे असल्याने धोरणात्मक बदलातून गुणवत्ता पूर्ण परिवर्तनातूनच राज्य बदलेल,देश बदलेल, अर्थकारण मजबूत होईल असे स्पष्ट करताना महाराष्ट्रात मध्यंतरी झालेल्या राजकीय सत्ता बदलाबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

केवळ राजकारण महत्त्वाचे नाही तर लोकांचे हित जपले जाणे गरजेचे आहे. कधीकाळी 33 कोटी लोकसंख्या असताना 33% आरक्षण होते आज 140 कोटींचा हा देश असल्याने महिलाविषयक धोरण बदलावे यातुन महिलांना राजकारणात येण्याची अधिक संधी मिळेल त्या जागा त्यांच्यासाठीच राखीव असाव्यात यावरही केसीआर यांनी भर दिला.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news