चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररित्या गोवंशाची तस्करी करणाऱ्या कंटेनर पकडण्यात सावली पोलिसांना यश आले. ही कारवाई शनिवारी (दि.८) रात्री एकच्या सुमारास मुल गोंडपिपरी मार्गावरील खेडी फाट्याजवळ करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईवेळी चालक कंटेनर सोडून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावली पोलिसांना अवैध गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री गोंडपिंपरी मार्गावरील खेडी फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. मुलकडून गोंडपिंपरी मार्गाकडे येणाऱ्या क्रं. टि. एस १२ यूडी २७८० या कंटेनरला थांबविले असता चालक पोलिसांना बघताच वाहन सोडून पळून गेला. या कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये ३६ गोवंशाची जनावरे आढळून आली. ३६ गोवंश जनावरांसह कंटेनर असा एकूण १३ लाख ६० हजारचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेले गोवंश जनावरे गोशाळेत दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात हवालदार दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, मोहन दासरवर यांनी केली.
हेही वाचा :