सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरात शनिवारी रात्री पिस्टलचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून रोख दीड लाख रुपये लुटल्याची घटना घडली. अजंठा चौकात ही घटना घडली असून सातार्यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अजंठा चौक येथे कपड्यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना तेथे दोघेजण आले. त्यांनी पिस्टलसारखी बंदूक काढून थेट दुकानदाराला धमकावले. या घटनेने मालक, कर्मचारी हादरून गेले. संशयित चोरटे दोघे होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. दुकानदाराने गल्ला मोकळा करत सर्व कॅश चोरट्यांना दिली. सुमारे 10 मिनिटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैसे घेऊन दुचाकीवरून रहिमतपूर दिशेने पोबारा केला. चोरटे गेल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यात रात्री नाकाबंदी करून चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. प्राथमिक माहिती नुसार सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेली बंदूक खरी की खोटी याबाबत पोलीस साशंक आहेत. मात्र चोरट्यांनी केलेले या लुटमारीमुळे सातारकर हादरून गेले आहेत.