रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा; पालकमंत्री मुनगंटीवारांचे निर्देश

रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा; पालकमंत्री मुनगंटीवारांचे निर्देश
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मुल येथील काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर आठवडाभरापूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ शोधून काढत कडक कारवाई करावी, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांना दिले. तसेच पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा अशा सूचना केल्या.

काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आठवडाभरापूर्वी (ता.11 मे ) मूल शहरात गोळीबार करून जिवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराना शोधून कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु एक आठवडा लोटूनही पोलिसांच्या हाती आरोपी हाती लागले नाही. परिणामी हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे आता मुनगंटीवारांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना लेखी पत्र देत हल्लेखोरांवर अटकेची कारवाई करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संतोष रावतांवरील प्राणघातक हल्ल्याची गंभीर दखल मुनगंटीवारांनी घेतल्याने पोलिसांना तत्काळ कारवाई करावी लागण्याचे मोठे आव्हान आहे.

अशी घडली घटना

मूल येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोरून रात्री पाऊने दहाच्या सुमारास दुचाकीने रावत जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यामध्ये गोळी हाताला चाटून गेल्याने रावत बचावले. त्यानंतर हल्लेखोर नागपूरच्या दिशेने पसार झाले. या घटनेने राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. त्यानंतर आरोपीवर कारवाई करण्यासाठी मूल येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनेही केली होती.आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नऊ पथक गठीत केली. पण पथकाला आरोपी गवसले नाहीत.

म्हणून पालकमंत्र्यांना लिहावे लागले पत्र

जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे. रावत यांचे कुणाशीही वैर नाही. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झडली गेली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आठवडा उलटून गेला तरीही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. संतोष रावत यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा मास्टर माईंड शोधून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी लाऊन धरण्यात आली आहे. यासाठी मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. सातत्याने या प्रकरणाचा फॉलोअप  भ्रमणध्वनीवरून घेतला. आरोपींना अटक करण्यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले होते. तरीही आरोपी अद्याप मोकाटच आहेत. म्हणून आज शुक्रवारी (ता. 19) मुनगंटीवारांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. 'हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व सविस्तर अहवाल कळवावा. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आतातरी आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news