

HSC Exam
गोंदिया : निसर्गाचा नियम मोठा क्रूर असतो, असं म्हटलं जातं. पण त्याच निसर्गाला आणि दुःखालाही थक्क करून सोडणारी एक हृदयद्रावक घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात समोर आली आहे. जिने जन्म दिला, लहानाची मोठी केली त्या आईचं पार्थिव घरात होतं आणि केवळ तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी १७ वर्षांच्या शालिनीने रडत-रडत बारावीचा पेपर दिला.
तुमखेडा येथील रहिवासी असलेली शालिनी पोंगळे हिची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. शालिनी ही गोरेगावमधील पी. डी. रहांगडाले विद्यालयातील बारावीची कला शाखेची विद्यार्थिनी, मंगळवारी (दि. २४) शालिनीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. पण पेपरच्या आदल्या दिवशी सोमवारी (दि. २३) रात्री ८ वाजता शालिनीची आई बविता पोंगळे (वय ३८) यांचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिने याबाबत प्राचार्य सी. डी. मोरघडे यांना फोनवरून माहिती दिली. आईचे निधन झाले असून अंत्यसंस्कार करायचे असल्याने मी पेपरला जाऊ शकत नाही, असे तिने सांगितले. मात्र प्राचार्य मोरघडे आणि वर्गशिक्षकाने शालिनीच्या घरी जाऊन तिला धीर दिला आणि समजूत काढून पेपरला घेऊन गेले.
एकीकडे जन्मदात्या आईचा विरह आणि दुसरीकडे करिअरचं महत्त्वाचं वर्ष. अशा कठीण प्रसंगी शालिनीने कमालीचा संयम आणि हिम्मत दाखवली. आईचं पार्थिव घरात असताना, तिने जड अंतःकरणाने परीक्षा केंद्र गाठलं. आईला शिक्षिका किंवा यशस्वी व्यक्ती म्हणून पाहायचं होतं, हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून तिने दोन तास परीक्षेचा पेपर लिहिला. आईची इच्छा होती की तिने शिकावं आणि मोठी व्हावं. तिचं हे स्वप्न अर्धवट राहू नये, म्हणूनच शालिनीने या परिस्थितीतही पेपर देण्याचा निर्णय घेतला.
परीक्षा आटोपल्यानंतर शालिनी तातडीने घरी परतली. त्यानंतर तिने आपल्या आईच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन साश्रू नयनांनी आईला अखेरचा निरोप दिला. शालिनीच्या या असीम धैर्याची आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. आईच्या पार्थिवाला घरात सोडून परीक्षेला जाणं, ही तिची खऱ्या अर्थाने 'अग्निपरीक्षा' ठरली असून, तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.