

Gondia news
गोंदिया: तिरोडा शहरातील १४ वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला चार वर्षाचा सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी मंगळवारी (दि.२३) विशेष सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी केली आहे.
तिरोडा शहरातील तीन मुली गणिताची नोटबुक परत करण्यासाठी ८ जुलै २०२४ रोजी नाग मंदिरापासून सपना फॅशन दुकानाजवळ जात असताना दुकानासमोर आरोपी महेश भोलाराम मुर्खे (३५, रा. सुभाष वॉर्ड, तिरोडा) याने पीडित अल्पवयीन मुलीकडे पाहून त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर तिघींच्या मधून चालत जाऊन त्याने पीडितेची छेड काढली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी धरले. आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ८ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास ठोठावला. तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ अंतर्गत एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास सुनावला.
सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात पीडितेची बाजू विशेष सरकारी वकील कृष्णा तिवारी यांनी मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी महिला शिपाई सविता नागपुरे यांनी सहकार्य केले.