गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : चार वर्षांपूर्वीच्या घरफोडी प्रकरणी गोंदियाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सोमावारी (दि.14)दिलेल्या निकालात आरोपीला ३ वर्षाचा सश्रम कारावास तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हसन मुजीब सिध्दीकी (वय २७ रा.कव्वाली मौदान जवळ, संजय नगर गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
चार वर्षांपूर्वी १२ एप्रिल २०२० रोजी फिर्यादी दिलीपकुमार कस्तुरचंज जैस्वाल ( रा. गुरुनानक वार्ड, गोंदिया) यांच्या शहरातील मनोहर चौक येथील देशी दारुच्या दुकानाचे ग्रील काढुन शटर उघडुन दुकानातील देशी दारु, चिल्लर नगदी रक्कम, सी.सी.टि.व्हि. कॅमेरा, डिव्हीआर, असा एकुण ४५ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. २७८/२०२० कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि. अन्वये गुन्हा दाखल करुन तपासात करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेवुन आरोपी हसन मुजीब सिध्दीकी यास अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला २४ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
दरम्यान, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलाश गवते यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुध्द सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात केले व आरोपी विरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे दोषारोपपत्र सादर करुन फौजदारी खटला क्रमांक १४८/२०२० प्रमाणे खटला चालविण्यात आला. खटल्याच्या अनुषंगाने सरकारी वकील व आरोपीच्या वकीलांच्या युक्तिवादानंतर आरोपीच्या विरोधात सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आज (दि.१४) आरोपी हसन मुजीब सिध्दीकी यास ३ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी केले तर न्यायालयीन कामकाज पोलीस हवालदार ओमराज जामकाटे, महिला पोलीस शिपाई निता पोटफोडे यांनी पाहिले.