

केज, पुढारी वृत्तसेवा: आगेवाडी (ता. केज) येथे सोयाबीन काढण्यास आलेल्या मजुराने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने शेत मालकाचे घर फोडून रोख रक्कमेसह दागिने असा १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आगेवाडी येथील शेतकरी भीमराव भगवान आघाव यांचे गावालगत शेत असून त्यांचे शेतात घर आहे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी मस्जीद बशीर शेख (रा. मामला ह. मु. बालेपीर, बीड) हा इतर मजुरासोबत आला होता. १२ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याला जात असताना भीमराव आघाव यांनी गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील पाच अंगठ्या काढून कपटात ठेवल्या होत्या. ते दागिने ठेवत असताना त्यांच्या घरी जेवत असलेल्या मस्जीद शेख या मजुराने पाहिले होते.
मेळाव्याहून परत आल्यानंतर रात्री ११ वाजता जेवण आटपून ते झोपले असता मस्जीद शेख या सोयाबीन काढण्यास आलेल्या मजुराने अनोळखी दोन साथीदारांना बोलावून घेतले. कपटाचे लॉक तोडून १५ ग्रॅमची सोन्याची साखळी, १३ व १२ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, पाच ग्रॅमच्या तीन अंगठ्या व नगदी २२ हजार रुपये असा १ लाख ८७ रुपयांचा ऐवज घेऊन ते दुचाकीवरून पळून जात असताना त्यांना जाग आली. त्यांनी तात्काळ कार चालकाला उठवून कारने त्यांचा अर्धा कि. मी. अंतरापर्यंत पाठलाग करीत पकडण्याचा प्रयत्न केला.
त्यापैकी एकाचे शर्ट त्यांच्या हातात आले. तिघे ही ऐवज घेऊन त्यांच्या हातातून निसटून जाण्यात यशस्वी झाले. त्यांची एक दुचाकी, मोबाईल, धारदार हत्यार, हातोडी हे पोलिसांकडे स्वाधीन केले. भीमराव आघाव यांच्या तक्रारीवरून मस्जीद बशीर शेख व अनोळखी दोघे अशा तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.