Gadchiroli News : आंबेशिवणी घाटातून रॉयल्टीविना रेती नेणारे ३ ट्रक जप्त, महसूल विभागाची कारवाई
Three trucks transporting sand without royalty
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा
गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथील घाटातून रॉयल्टीविना रेती वाहतूक करणारे तीन मोठे ट्रक रेतीसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. हे तिन्ही ट्रक अमरावती येथील असल्याने आंबेशिवणीच्या घाटातून गडचिरोलीतील उच्च दर्जाच्या रेतीची थेट पश्चिम विदर्भात तस्करी होत असल्याचे स्प्षष्ट झाले आहे.
महसूल विभागाने ट्रक घेतले ताब्यात
सोमवारी (ता.२८) मध्यरात्री आंबेशिवणी येथील घाटातून रेती उपसून ती रॉयल्टीविना मोठ्या ट्रकमधून गोगावमार्गे आरमोरी, नागपूर व पुढे अमरावतीला नेण्यात येत होती. काही ट्रक पुढे निघून गेले. परंतु एका ट्रकचालकाच्या चुकीमुळे तीन ट्रक गोगावनजीकच्या अडपल्ली येथे भलत्याच रस्त्याकडे गेले आणि अरुंद रस्त्यात फसले. या विषयीची वार्ता पसरताच मंगळवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता ट्रकमधून रॉयल्टीविना रेतीची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन रेती आणि ट्रक ताब्यात घेतले.
यातील ट्रक शकीब अन्वर खान नईम खान, मोहम्मद इद्रिस युसुफ व मुदृसर हुसैन अल्ताफ हुसैन यांच्या मालकीचे असून, तिघेही अमरावती येथील रहिवासी आहेत. दोन ट्रकमधून प्रत्येकी ६ ब्रास आणि तिसऱ्या ट्रकमधून ८ ब्रास अशी एकूण २० ब्रास रेती जप्त करण्यात आली.
बयाण नोंदविल्यानंतर संबंधितांकडून शासकीय नियमानुसार दोन ट्रकवर रेतीसंबंधीचा २ लाख २३ हजार २०० रुपये व तिसऱ्या ट्रकवर १ लाख ४८ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात येईल. शिवाय प्रतिट्रक २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी आमदारांच्या तक्रारीत तथ्य
मागील आठवड्यात गडचिरोलीचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात शंभर कोटी रुपयांची रेती तस्करी होत असल्याचा आरोप केला होता. अशातच तीन ट्रक पकडल्याने डॉ.होळी यांच्या आरोपात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेशिवणी येथील घाटातून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक होत असून, त्यात काही राजकीय नेते सहभागी असल्याचे बोलले जात आहे.

