

Former BJP MLA Dr. Ramdas Ambatkar passes away
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे आज वयाच्या 65 व्या वर्षी (बुधवार) चेन्नई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
पक्षसंघटना, कार्यकर्ता, माणूस व विचारासाठी झटणारा, पूर्ण आयुष्य वेचणारे उत्तम कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले रामदास आंबटकर गेले काही दिवस किडनी विकाराने महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटर चेन्नई येथे उपचारासाठी दाखल होते. त्यांच्या मागे पत्नी गीता, भगिनी, मुलगा अजिंक्य आणि परिवार आहे.
माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी कायम आवाज उठवला. कुशल संघटक आणि विचारधारेप्रती कायम समर्पित असलेल्या रामदास आंबटकर यांच्या निधनाने विदर्भातील सामाजिक-राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असे गडकरी यांनी म्हंटले आहे.
डॉ. रामदास भगवानजी आंबटकर यांचा जन्म १ जुलै १९६० रोजी वर्धा जिल्ह्यातील वडनेर या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांनी सलग तीन वेळा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आणि आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि शिकवण खोलवर रुजवली. त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन डॉ. रामदास यांनीही राष्ट्र उभारणीसाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी संघाच्या माध्यमातून स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
१९८४ मध्ये अभाविपचे विस्तारक आणि पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. नागपूर विद्यापीठातून बीएएमएसचा अभ्यास, १९९५ मध्ये आरटीएम नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सदस्य झाले. २००५ मध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य झाले. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षात (भाजपा) अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे संघटन सचिव म्हणून सामील झाल्यानंतर त्यांनी राजकारणाचा प्रवास सुरू केला.
२००६ मध्ये पश्चिम विदर्भात पक्षाच्या कार्यक्षेत्राचा यशस्वी विस्तार केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि अनुभवी नेते प्रा. बी.टी. देशमुख यांना अमरावती मतदारसंघात पराभूत करण्यासाठी रणनीती यशस्वी केली. डॉ. रणजित पाटील यांचा विजय झाला. २०१५ मध्ये त्यांना भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस बनवण्यात आले. विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी) म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.