स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर अतिदुर्गम कटेझरी गावात प्रथमच पोहोचली महामंडळाची बस
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा
एकेकाळी नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या आणि अतिदुर्गम व आदिवासीबहुल कटेझरी गावात स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर प्रथमच परिवहन महामंडळाची बस पोहोचली. पोलिस दलाच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या या बसचे स्थानिक नागरिकांनी ढोल-ताशांच्या निनादात स्वागत केले.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावात अजूनही दळणवळणाची प्रभावी साधने नाहीत. त्यामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. धानोरा तालुक्यातील मुरुमगावनजीकचे कटेझरी हे गावदेखील असेच आहे. तेथे शनिवारी २६ एप्रिलला बसचा शुभारंभ करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी बसचे स्वागत करुन नागरिकांना मार्गदर्शन केले. स्थानिक नागरिकांनीही ढोल-ताशांच्या निनादात आनंद व्यक्त केला. कटेझरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी हिरवी झेंडी दाखवून बसला मार्गस्थ केले. यावेळी बसचालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी बसमधून प्रवास केला. आजूबाजूच्या १० ते १२ गावांतील नागरिकांना या बससेवेचा लाभ होणार आहे.
पोलिसांच्या पुढाकाराने १८ रस्ते आणि ५९ पुलांचे बांधकाम
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, जगदीश पांडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात.
यंदा १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा ते गर्देवाडा व त्यापुढे वांगेतुरी बस सेवा देखील सुरु करण्यात आली. दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये ४३४.५३ किलोमीटर लांबीच्या एकूण १८ रस्त्यांसोबतच एकूण ५९ पुलांचे बांधकाम पोलिस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे. आता अतिदुर्गम कटेझरी येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध झाल्याने त्यांची ससेहोलपट थांबणार आहे.

