

गडचिरोली : पोलिओ डोज पाजल्यानंतर प्रकृती खालावल्याने रुग्णवाहिकेद्वारे अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना नवजात बाळाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२०) छल्लेवाडा येथे उघडकीस आली.
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील श्रीराणी नवीन ताटपल्ली या महिलेची १८ डिसेंबरला छल्लेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसाधारण प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मानंतर नवजात बाळाची प्रकृती व्यवस्थित होती. माताही सुखरुप होती. त्यामुळे तिला त्याच दिवशी सुटी देण्यात आली. त्यानंतर २० डिसेंबरला आशा सेविकेने गृहभेट देऊन नवजात बाळाला पोलिओ डोस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले. पोलिओ डोस घेताच बाळ रडायला लागले आणि त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला शासकीय रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतू रुग्णवाहिकेत ऑक्सिजन उपलब्ध नव्हते. त्यामुळे बाळाची प्रकृती अधिकच बिघडली. उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथील बालरोग तज्ज्ञांनी तपासणी केली असता त्यांनी बाळाला मृत घोषित केले.
याबाबत अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ.आर.एल.हकीम यांनी सांगितले की, रुग्णालयात आल्यावर तपासणी करताच बाळ मृतावस्थेत आढळले. बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही. मात्र, हायपोथर्मिया, थंडी, दूध न मिळाल्यास किंवा दूध फुफ्फुसात गेल्यास श्वास गुदमरल्यानेही बाळाचा मृत्यू होऊ शकतो.