

कसारा : शहापूर येथील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स मधील दिनेशकुमार मोनाराम चौधरी याच्यावर शनिवार (दि.21) रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात दिनेश चौधरी हा 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. पोटात गोळी लागल्याने जखमी दिनेशला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमोपचार करण्यात आले आहेत. तर पुढील उपचारासाठी दिनेशला ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आल्यानंतर रविवार (दि.22) रोजी सकाळी दिनेशचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शहापूर तालुका व्यापारी मंडळातर्फे घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीसाठी रविवार (दि.22) शहापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शहापूरकरांनानी बंदला उत्तम प्रतिसाद दिला असून घटनेचा निषेध म्हणून शहरातून मूक मोर्चा देखील काढण्यात आला. त्यानंतर हा मुक मोर्चा शहापूर पोलीस ठाण्याव्या आवरात दाखल होत मृत दिनेशला श्रद्धांजली वाहण्यात आली. मूक मोर्चात मा. आमदार पांडुरंग बरोरा यांनी उपस्थित राहून व्यापारी मंडळाच्या मूक मोर्चात सहभागी नोंदवला. मूकमोर्चामध्ये तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, नेते व असंख्य व्यापारी, नागरिक सामील झाले.
दरम्यान गोळीबार नक्की कोणत्या हेतूने करण्यात आला. याबाबत शहापूर पोलीस तपास करीत असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. शनिवारी (दि.21) पासून रात्री घटनास्थळी डॉग स्कॉड मार्फत पुढील तपास सुरु करण्यात आलेला आहे.