

Naxal Movment
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली पोलिस मुख्यालयात सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या १२ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं, तर १३ आत्मसमर्पित नक्षलींचे सामूहिक विवाह लावून देण्यात आले.
सुरुवातीला १३ आत्मसमर्पित नक्षल्यांचा वैदिक पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १२ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात ४ विभागीय समिती सदस्यासंह कमांडर, उपकमांडर व सदस्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. याप्रसंगी २२ मे रोजी भामरागड तालुक्यातील कवंडे परिसरात चार नक्षल्यांना कंठस्नान घातल्याबद्दल अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश तसेच अभियानात सहभागी पोलिस अधिकारी आणि जवानांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सतत दहा वर्षे महाराष्ट्राने नक्षलवाद्यांविरुद्ध अखंड अभियान राबवून नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. ज्या भागात नक्षल्यांचा प्रभाव होता, तेथे हळूहळू एकेक पोलिस मदत केंद्र उघडून पोलिसांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे. नक्षलवादाच्या विरोधात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. पूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षल्यांची भरती होत होती. परंतु तेथे सत्तारुढ झालेले नवीन सरकार आणि केंद्र सरकार यांनी तेथील नक्षलवादाचा बीमोड करण्यास प्रारंभ केला आहे. आता नक्षलवादाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कवंडे येथील पोलिस मदत केंद्राला भेट देऊन जनजागरण मेळाव्याला संबोधित केले. याप्रसंगी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, लॉयडस मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन उपस्थित होते.