

गडचिरोली : सूमारे ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या तीन जहाल नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. विक्रम तुलावी, नीलाबाई उईके आणि वसंती हिडामी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत. विक्रम आणि वसंती हे पती- पत्नी आहेत. विक्रम तुलावी हा 2004 मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. पुढे विविध दलममध्ये काम केल्यानंतर तो आजतागायत कंपनी क्रमांक १० विभागीय समिती सदस्य म्हणून कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नीलाबाई उईके ही 1988 मध्ये भामरागड दलममध्ये भरती झाली. पुढे तिने छत्तीसगड मधील बस्तर व माड दलममध्ये काम केले. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
वसंती हिडामी ही 2008 मध्ये गुरेंकसा गावातील क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेची सदस्य झाली. त्यानंतर तिने टिपागड दलमम, कंपनी क्रमांक ४, कंपनी क्रमांक १०, दंडकारण्य समिती इत्यादी ठिकाणी काम केले. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.