

Baswa Raju Maoist Leader Gadchiroli Naxal News
गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत २८ नक्षली ठार झाले, असे सांगून माओवाद्यांचा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता 'विकल्प' याने माओवादी कम्युनिस्ट पार्टी आपल्या मुख्य नेतृत्वाला सुरक्षा पुरविण्यात अयशस्वी ठरल्याची कबुली दिली आहे.' त्याचबरोबर विकसित भारत निर्माण करण्याच्या नावाखाली सरकार कार्पोरेट हिंदू राष्ट्र निर्माण करीत आहे, अशी टीकाही विकल्पने केली आहे.
२१ मे रोजी छत्तीसगडच्या अबुझमाड जंगल परिसरातील गुंडेकोट भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवा राजू याच्यासह २८ नक्षली ठार झाले. यासंदर्भात माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता 'विकल्प' याने प्रथमच पत्रक जारी केले आहे.
मागील ६ महिन्यांत छत्तीसगडमधील वेगवेगळ्या दलममधील अनेक नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यांनी बसवा राजू व अन्य वरिष्ठ नक्षल्यांबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जानेवारी व मार्च या दोन महिन्यांत दोन मोठे अभियान राबविले. परंतु, त्यावेळी बसवा राजूला ठार करण्यात पोलिसांना यश आले नाही. पुढील दीड महिन्यात बसवा राजूच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी असलेल्या ६ वरिष्ठ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी बसवा राजूच्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती पोलिसांना दिली. पुढे हे सहाही जण स्वत: नक्षलविरोधी अभियानात सहभागी झाल्याने राजू यास ठार करणे सोपे झाले, असे माओवादी प्रवक्ता 'विकल्प' याने पत्रकात म्हटले आहे.
२१ मे रोजी झालेल्या घटनेच्या चार दिवसांपूर्वीच्या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख विकल्प याने पत्रकात केला आहे. घटनेच्या वेळी ३५ नक्षली होते. त्यापैकी २८ नक्षली ठार झाले, असे सांगून विकल्प याने माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवा राजू यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आम्ही असफल ठरलो, अशी कबुली दिली आहे.
बसवा राजू यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कवचातील कंपनी क्रमांक ७ मध्ये जानेवारी महिन्यापर्यंत ६० नक्षली होते. परंतु प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांचा घेराव भेदून सुरक्षितरित्या निसटता यावे, यासाठी ही संख्या कमी करण्यात आली. अशातच काही वरिष्ठ नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे घटनेच्या वेळी केवळ ३५ नक्षली होते. एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या पोलिसांच्या अभियानाविषयी आम्हाला पूर्वकल्पना होती. परंतु, सुरक्षित ठिकाणी जाण्यास बसवा राजू तयार नव्हता, असेही विकल्प याने म्हटले आहे. बसवा राजूच्या सूचनेवरुनच 'शांतीवार्ता' साठी अनुकूल वातावरण तयार व्हावे, म्हणून माओवाद्यांनी ४० दिवस एकही कारवाई केली नाही. परंतु केंद्र व राज्य सरकारने बसवा राजूला ठार केले. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी आवाज उठवला नाही, अशीही टीका 'विकल्प' ने मीडियावर केली आहे.