

गडचिरोली : विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिलेल्या जहाल नक्षल दाम्पत्याने सोमवारी (दि.14) केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. वरुण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मनिराम उर्फ रेंगू (२७) आणि त्याची पत्नी रोशनी विजया वाच्छामी (२४) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या दापंत्याचे नावे आहे. वरुण मुचाकी हा छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील पिडमिली येथील मूळ रहिवासी आहे. २०१५ मध्ये तो छत्तीसगड राज्यातील कोंटा एरिया दलममध्ये भरती झाला. त्यानंतर २०२० पर्यंत त्याने दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य गिरीधरचा अंगरक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्याची भामरागड दलममध्ये बदली झाली. २०२२ पर्यंत तो भामरागड दलमचा उपकमांडर आणि नंतर कमांडर झाला. सद्य:स्थितीत तो कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १० आणि इतर ५ असे एकूण १५ गुन्हे दाखल असून, शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
वरुणची पत्नी रोशनी ही भामरागड तालुक्यातील मल्लमपोडूर येथील रहिवासी आहे. २०१५ मध्ये ती छत्तीसगडमधील राही दलममध्ये भरती झाली. दुसऱ्याच वर्षी तिची भामरागड दलममध्ये बदली झाल्यानंतर ती तेथे २०१७ पर्यंत कार्यरत होती. पुढे अहेरी दलम, गट्टा दलममध्ये काम केल्यानंतर पुन्हा भामरागड दलममध्ये तिची बदली करण्यात आली. आजतागायत ती तेथे कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १३ आणि अन्य १० अशा एकूण २३ गुन्ह्यांची नोंद असून, शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
२०२२ पासून आतापर्यंत २७, तर २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६७४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे कमांडंट दाओ किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.