Gadchiroli Irpundi :
गडचिरोली : आपण जेव्हा एखाद्या गावाची कल्पना करतो, तेव्हा नजरेसमोर 20 ते 25 घरे, ग्रामपंचायत, अंगणवाडी, मध्यभागी देऊळ आणि रस्त्यावर ये-जा करणारी गुरढोरं असं चित्र उभं राहतं. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामध्ये इरपुंडी नावाचं एक गाव आहे, जिथे फक्त एकच घर आणि एकच कुटुंब वास्तव्य करत आहे.
झाडे कुटुंबातील सात सदस्य हीच या गावाची एकूण लोकसंख्या आहे. मागील 40 ते 45 वर्षांपासून हे कुटुंब इरपुंडी या गावात एकमेव घरात राहत आहे. इरपुंडी हे गाव गडचिरोली शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे, तर जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर आहे. इरपुंडीपासून सर्वात जवळचं मोठं गाव तुकुम हे पाच किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे, 2011 साली झालेल्या शासकीय जनगणनेत इरपुंडीची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून, हे गाव महसूली गाव म्हणून ओळखले जाते. अवघी सात लोकसंख्या असलेले हे गाव सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
अति दुर्गम आदिवासी बहुल भाग अशी ओळख असलेल्या या गावात नेटवर्कची सुविधा उपलब्ध आहे. सरकारने या गावासाठी सिमेंट रस्त्याचे बांधकामही करून दिले आहे. मात्र, घनदाट जंगलातील या घरात वास्तव्य करत असताना त्यांना वन्यप्राण्यांची भीती वाटते. भीती वाटत असली तरी, जायचे तरी कुठे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न झाडे कुटुंबासमोर आहे.
पूर्वजांनी जी जागा धरून दिली आहे, त्याच ठिकाणी सध्या वास्तव्य करत असल्याचे झाडे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "राहून राहून आम्हाला सवय झाली. भीती वाटते, पण आता दुसरीकडे कुठे जाऊन आम्हाला जमीन आणि घर बांधण्यासाठी जागा मिळेल? म्हणून इथे राहावे लागते".