

Gondwana University ranking
गडचिरोली: उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयामार्फत सार्वजनिक विद्यापीठांतर्गत आस्थापनांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवाकर्मी उपक्रमाच्या नुकत्याच झालेल्या गुणांकनात गोंडवाना विद्यापीठाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरीचा मान मिळवला आहे.
आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन व ५ कोर्सेस पूर्ण करणे, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करुन ते डिजिटल करणे तसेच विद्यापीठातील प्रशासनिक पारदर्शकता, कर्मचारी सेवा-सुविधांचे प्रभावी व्यवस्थापन यासह अन्य घटकांच्या आधारे हे गुणांकन करण्यात आले. त्यात गोंडवाना विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला. याबाबत कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
यापूर्वीही गोंडवाना विद्यापीठाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला राज्य शासनाचा एक आणि राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. निर्धारित वेळेत परीक्षांचे निकाल जाहीर केल्याबद्दल राज्यपालांचे प्रशस्तीपत्र,तसेच ग्रामसभा सक्षमीकरणाच्या एकल प्रकल्पाला फिक्की पुरस्कार मिळाला आहे. ई-समर्थ मोड्युल्सची अंमलबजावणी करण्यातही गोंडवाना विद्यापीठ राज्यात द्वितीय स्थानावर आहे, हे येथे उल्लेखनीय.