

Jindal Group Land Acquisition in Desaignaj Gadchiroli
गडचिरोली : जिंदाल उद्योग समूह (JSW) देसाईगंज तालुक्यात स्टील उद्योग उभारणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची २ हजार हेक्टर सुपीक जमीन अल्प दरात घशात घालण्याचा घाट घालत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.१७) येथे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला खा.डॉ.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अॅड.राम मेश्राम, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड.विश्वजित कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
आ.वडेट्टीवार म्हणाले, जिंदाल उद्योग समूह देसाईगंज तालुक्यात स्टील उद्योग उभारणार असून, त्यासाठी २ हजार १२८ हेक्टर खासगी व १७४ हेक्टर सरकारी अशी एकूण २ हजार ३०३ हेक्टर जमीन अधिग्रहीत करणार आहे. खासगी जमीन शेतकऱ्यांची असून, ती इटिया डोह प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. मात्र, जिंदाल समूह ही जमीन कवडीमोल दराने खरेदी करणार आहे. नव्या दरानुसार, शेतजमिनीला किमान चारपट भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु या समुहाने आपले दर निश्चित केले असून, ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. भविष्यात या उद्योगात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असे सरकार आणि हा उद्योग समूह सांगत असेल; तर मग एवढी मोठी जमीन एकाचवेळी अधिग्रहीत करण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल आ.वडेट्टीवार यांनी केला. गुंतवणूक टप्प्याटप्प्याने येणार असेल तर जमीनसुद्धा टप्प्याटप्प्यानेच अधिग्रहीत करावी जेणेकरुन शेतकऱ्यांना भविष्यातील दर मिळेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
जेएसडब्ल्यूच्या उद्योगामुळे कोंढाळा, कुरुड, शिवराजपूर, वडेगाव इत्यादी ८ गावे बाधित होणार असून, ३ गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. सुमारे ९ हजार हेक्टरवर एमआयडीसी उभी राहणार आहे. एकूणच शेतकऱ्यांना उदध्वस्त करण्याचा सरकारचा डाव असून, सरकारमधील तिन्ही पक्ष मलिदा खाण्यासाठी जेएसडब्ल्यूची पाठराखण करीत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
रेडिरेकनरच्या नव्या दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १ कोटी रुपये दर द्यावा आणि अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या दोन एकर जमिनीमागे एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. स्टील कारखान्यामुळे प्रदूषण प्रचंड वाढणार असून, परिसरातील शेती आणि गावकऱ्यांना विविध आजारांना बळी पडावे लागेल, असा धोक्याचा इशाराही वडेट्टीवारांनी दिला.
पूर्वी जेएसडब्ल्यूला सुरजागड पहाडावरील लोहखनिजाची लीज ६६० रुपये प्रतिटन दराने देण्यात आली होती. परंतु निर्धारित मुदतीत या कंपनीने उत्खनन न केल्याने लीज व्यपगत झाली. त्यामुळे या खाण पट्ट्याचा खुला लिलाव करणे नियमानुसार अभिप्रेत होते. मात्र, शासनाने तसे न करता जुन्याच रॉयल्टी दराने लीज दिली. ही कंपनी दरमहा २५ लाख टन उत्खनन करणार आहे. नव्या दराने लीज दिली असती तर शासनाला ५ हजार कोटीचा महसूल मिळाला असता. आता हा महसूल बुडणार आहे. जिंदाल हे भाजपचे खासदार असल्याने सरकार त्यांच्यासाठी सर्व मुभा देत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.