

Encounter on Gadchiroli-Chhattisgarh border; Naxal camp destroyed
गडचिरोली : जयंत निमगडे
भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात आज (सोमवार) पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त करीत त्यांच्याकडील बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. या चकमकीत काही नक्षली जखमी किंवा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील कवंडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत भामरागड दलमच्या नक्षल्याचे शिबिर असल्याची माहिती रविवारी (ता.११) दुपारी पोलिसांना मिळाली. त्यानंतर संध्याकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या दोनशे जवानांनी त्या परिसरात नक्षल शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती.
आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांचा हल्ला परतवून लावला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य आढळून आले. पोलिसांनी नक्षल्यांकडील एक इन्सास, एक रायफल, एक मॅगेझिन, काडतुसे, डिटोनेटर्स, ३ पिट्टू, चार्जर, पुस्तके व अन्य साहित्य ताब्यात घेतले. या चकमकीत काही नक्षली जखमी वा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देश नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली होती. यानंतर सरकारने मोठ्या प्रमाणात सैन्य कारवाई करत नक्षल्यांचा बिमोड करायला सुरूवात केली आहे. याला यशही येत आहे. मात्र अजुनही छत्तीसगडसारख्या राज्यातील जंगलाच्या आश्रयाने नक्षलवादी सक्रीय आहेत.
भारत सरकारच्या नक्षली मोहिमेमुळे अनेक जहाल नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी आत्मसमर्पणही केले आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्यासाठीचा एक संधी दिली जाते. मात्र काही नक्षलवादी अजुनही सरकारविरोधात काम करीत असून, त्यांच्यावर कारवाई तीव्र करण्यात आली आहे.