

Dr Rajabhau Munghate Award
गडचिरोली : कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांची महाराष्ट्र शासनाच्या डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शिक्षक दिनानिमित्त येत्या ५ सप्टेंबरला पुणे येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. मुनघाटे गेल्या २३ वर्षांपासून प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत असून, दुर्गम भागातील शैक्षणिक विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, बालभारती पुणेचे सदस्य तसेच मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे.
नॅक पियर टीमचे सदस्य म्हणून त्यांनी देशातील विविध राज्यांतील महाविद्यालयांना सहा वेळा भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. चीन, रशिया, दुबई, बाली, सिंगापूर आणि मलेशिया आदी देशांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधनपर लेख सादर केले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयात उन्नत भारत अभियान, वेलनेस क्लब, महिला अध्ययन, राष्ट्रीय सेवा योजना, रोजगार मार्गदर्शन केंद्र यांसह विविध उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाला सलग पाच वर्षे गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार माझा नसून, सर्व सहकाऱ्यांचा असल्याची भावना प्राचार्य डॉ.मुनघाटे यांनी व्यक्त केली आहे.