

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोईंदूळ येथून स्ट्रेचरवरून दोन पूरग्रस्त नाले पार करत रुग्णालयात पोहोचविण्यात आलेल्या गर्भवती महिलेने हेडरी येथील खासगी रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, २४व्या आठवड्यातच प्रसूती झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या चिमुकलीला श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
कोईंदूळ येथील छाया सुरेश नैताम (२६) यांना २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यावेळी गावालगतचे दोन नाले पुराच्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहत असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकेच्या मदतीने छाया नैताम यांना स्ट्रेचरवरून नेले. पूर आलेले दोन्ही नाले पार करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रथम त्यांना तोडसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी हेडरी येथील लॉयडस् कालीअम्मल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गर्भधारणेचा सामान्य कालावधी सुमारे ४० आठवड्यांचा असतो. मात्र, छाया नैताम यांची २४व्या आठवड्यातच प्रसूती झाली. त्यामुळे दोन्ही बाळांचे वजन अत्यंत कमी होते. एका बाळाचे वजन ७०० ग्रॅम, तर दुसऱ्या बाळाचे वजन अवघे ६०० ग्रॅम होते. ७०० ग्रॅम वजनाच्या मुलीचा जन्मापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर ६०० ग्रॅम वजनाच्या दुसऱ्या मुलीला जन्मानंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. सध्या आई आणि बाळावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
छाया नैताम यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर आणि नवजात मुलीवर आवश्यक उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली. दरम्यान, अतिदुर्गम कोईंदूळ गावात रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून पुराचे नाले पार करून रुग्णालय गाठावे लागल्याने या भागातील रस्ते आणि पूल सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.