

गडचिरोली: नक्षल्यांच्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची एकमेव महिला सदस्य पोथुला पदमावती उर्फ सुजाता(६३) हिने आज हैदराबाद येथे तेलंगणाचे पोलिस महासंचालक डॉ.जितेंद्र यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. तिच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते.
तेव्हाच्या आंध्रप्रदेशातील व आताच्या तेलंगणा राज्यातील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील पेंचीकलपाडू गावात पोथुला पदमावती उर्फ सुजाता हिचा जन्म झाला. तिचे वडील थिम्मा रेड्डी हे गावचे पोस्टमास्तर होते. १९८२ मध्ये तिचा एक सख्खा मोठा भाऊ पोथुला श्रीनिवास रेड्डी तेव्हाच्या पीपल्स वॉर ग्रूपमध्ये सहभागी झाला. काही दिवसांतच तिचे चुलतभाऊ पटेल सुधाकर रेड्डी उर्फ सुर्यम व पोथुला सुदर्शन रेड्डी उर्फ आरके हे नक्षल चळवळीत सहभागी झाले. त्यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन सुजातादेखील वयाच्या अठराव्या वर्षी डिसेंबर १९८२ मध्ये नक्षल चळवळीत दाखल झाली.
दोन वर्षे ग्रामप्रचारक व चेतना नाट्य मंचमध्ये काम केल्यानंतर तिने १९८४ मध्ये जहाल नक्षली मल्लोजुल्ला कोटेश्वर राव उर्फ किशनजी याच्याशी विवाह केला. त्यानंतर दोघांनाही गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा विस्तार करण्यासाठी पाठविण्यात आले. १९८८ ते ८९ या काळात सुजाताने गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली व एटापल्ली दलममध्ये उपकमांडर म्हणून काम केले. १९९६ मध्ये ती गोंदिया जिल्ह्यातील देवरी दलमची कमांडर झाली. पुढे १९९७ मध्ये तिला छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरची विभागीय समिती सदस्य म्हणून बढती देण्यात आली. त्यानंतर २००७ मध्ये तिच्याकडे दंडकारण्य झोनमध्ये जनताना सरकारचे महत्वाचे पद सोपविण्यात आले. २००८ मध्ये सुजाताचा पती किशनजीकडे पश्चिम बंगालची जबाबदारी सोपविण्यात आली. तो नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि पश्चिम बंगाल राज्य समितीचा सचिव झाला. मात्र, २४ नोव्हेंबर २०११ रोजी बंगाल व झारखंडच्या सीमावर्ती भागातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. इकडे सुजाता दंडकारण्यात भूमिगत राहून नक्षल कारवाया करीत होती. २०२२ मध्ये तिची केंद्रीय समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यंदा मे २०२५ मध्ये आजाराच्या कारणाने तिने आत्मसमर्पण करण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली होती. अखेर आज तिने आत्मसमर्पण केले.
दोन जावांचे आत्मसमर्पण
आज तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलेली पोथुला पद्मावती उर्फ सुजाता ही यापूर्वी आत्मसमर्पण केलेली जहाल नक्षली तारक्का हिची सख्खी मोठी जाऊ आहे. सुजाताचा पती किशनजी आणि तारक्काचा पती मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ अभय हे दोघे सख्खे भाऊ. किशनजी मोठा तर भूपती लहान. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायका नक्षल चळवळीत १९८० च्या दशकापासून सक्रिय होते. किशनजी २०११ मध्ये ठार झाला. भूपती हा केंद्रीय समिती सदस्य व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रमुख असून, अजूनही तो नक्षल चळवळीत सक्रिय आहे. त्याची पत्नी तारक्का हिने १ जानेवारी २०२५ रोजी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आज तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिची जाऊ सुजाता हिनेदेखील आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला.