

गडचिरोली: वडिलोपार्जीत जमिनीचा हिस्सा मागितला म्हणून सख्ख्या पुतण्याचा खून करणाऱ्या काकासह त्याच्या सहकाऱ्यास कोरची पोलिसांनी अटक केली आहे. तब्बाल दोन वर्षांनंतर खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रामदास अमरु कळयामी(५९), रा.आंबेखारी,ता.कोरची व दसरु ठाकूरराम कल्लो(४२) रा.बोंडे,ता.कोरची अशी आरोपींची नावे आहेत. आंबेखारी गाव कोरचीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी गावातील दिनेश शामसाय कडयामी याने पोलिसांत तक्रार केली की, त्याची आई दुलमाबाई कडयामी (५०) ही केरसुणीचे गवत आणण्यासाठी जंगलात गेली होती. तेव्हा तिला जमिनीत अर्धवट पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला.
हा मृतदेह मोठा मुलगा महेश शामसाय कडयामी (२३) याचा असल्याचा संशय व्यक्त करीत तिने गावकऱ्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना कळविले. पुढे तहसीलदार प्रशांत गड्डम, पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे,वैद्यकीय अधिकारी श्रेया बुद्धे यांनी घटनास्थळी जाऊन सांगाडा ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. आढळलेल्या सांगाड्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर आढळलेला सांगाडा महेश कडयामी याचाच असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरु होता.
जमिनीसाठी भांडत होता मृतक
मृतक महेश हा त्याचे वडील शामसाय व मोठे वडील रामदास कडयामी यांना जमिनीचा हिस्सा मागत होता. जुलै २०२४ मध्ये दुपारी महेश कडयामी हा मयालघाट येथील अक्षय मडावी याच्यासमवेत त्याचे मोठे वडील रामदास कडयामी याच्या घरी गेला, तेव्हा जमिनीच्या हिस्सेवाटणीवरुन त्याचे रामदासशी भांडण झाले. पुन्हा संध्याकाळी त्याच्या घराकडे गेला तेव्हाही त्याचे भांडण झाले. त्यानंतर तो अक्षयसोबत मासेमारीसाठी गेला होता. त्याचवेळी रामदास कडयामी हा दसरु कल्लोसोबत कुऱ्हाड घेऊन पाठलाग करीत महेशचा पाठलाग करीत जंगलाकडे गेला.
रात्री ९ वाजता दोघेही परत आले. त्यांनी महेशचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. दुसऱ्या दिवशी रामदास कडयामी याने रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुतली. तपासादरम्यान पोलिसांना दोघांनी ही माहिती दिली. त्यावरुन आज दुपारी रामदास कुडयामी व दसरु कल्लो यांना अटक केली. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक फौजदार दलपत मडावी, हवालदार लक्ष्मण नैताम, हस्तकला दर्रो, इंसाराम ताराम, धोंडणे ही कारवाई केली.