

गडचिरोली : वडिलांच्या नावावर असलेल्या ट्रॅक्टरवर कर्जाची रक्कम थकीत असताना तो ट्रॅक्टर स्वत:च्या नावावर असल्याचे भासवून बाँड पेपरवर विक्री करुन एका महिलेची ७ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी चामोर्शी येथील स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे, त्याची पत्नी आणि भाजपची नगरसेविका सोनाली पिपरे व वडील अरुण पिपरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आशिष पिपरे यांनी संगनमत करुन एमएच ३३ वी ८०७५ क्रमांकाचा वडील अरुण पिपरे यांच्या नावावर असलेला मेस्सी कंपनीचा ट्रॅक्टर स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून चामोर्शी येथील वंदना सविंद्र कोठारे यांना पाचशे रुपयांच्या बाँडवर ७ लाख ५० हजार रुपयांना विकला. या ट्रॅक्टरवर हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे कर्ज असतानाही पिपरे याने संबंधित महिलेस ट्रॅक्टरची विक्री करुन आरटीजीएस प्रणालीद्वारे वंदना कोठारे यांच्या पतीच्या बँक खात्यावरुन रक्कम स्वीकारली. मात्र, संबंधित ट्रॅक्टरवर ४ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज थकीत असल्याने हिंदुजा लेलँड कंपनीने ट्रॅक्टर कोठारे यांच्या घरुन जप्त केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वंदना कोठारे यांनी आशिष पिपरे, सोनाली पिपरे व अरुण पिपरे यांच्या घरी जाऊन जाब विचारला. परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ केली तसेच बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे वंदना कोठारे यांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलि निरीक्षक दीपक डोंब यांनी आरोपी आशिष पिपरे, सोनाली पिपरे व अरुण पिपरे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पिपरे यांचा पाय खोलात
२०२० मध्ये चामोर्शी येथील भाजप नेते तथा नगरसेवक आशिष पिपरे यांनी ४० गरीब महिलांना अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवले होते. पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेंतर्गत कर्ज मंजूर करून ते माफ करून देण्याचे खोटे आश्वासन त्यांनी दिले. पुढे बँकेशी संगनमत करून प्रत्येक लाभार्थी महिलेच्या नावे १ लाख ९० हजार ते २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, महिलांच्या खात्यात जमा झालेली ही कर्जाची रक्कम पिपरे यांनी स्वत:च्या खात्यात वळती केली. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथील हरीक्रिष्ण इंजिनिअरिंग कंपनीकडून हलक्या दर्जाच्या अगरबत्ती निर्मिती मशिन आणल्या. विशेष म्हणजे प्रत्येक मशिनच्या कोटेशनची रक्कम १ लाख रुपये दाखवले. प्रत्यक्षात मशिन २५ हजार ५०० रुपयांना खरेदी केली. पुढे सर्व मशिन आपल्या घरीच ठेवून नवीन जमीन खरेदी केली आणि त्यावर टिनाचे शेड उभारले. तेथे मोठ्या थाटात अगरबत्ती प्रकल्प उभा केला. परंतु अवघ्या सहा महिन्यांतच हा प्रकल्प बंद केला.
त्यानंतर बँकेकडून महिलांनी कर्ज घेतले असल्याने संबंधित बँकेने महिलांना कोर्टामार्फत नोटीस पाठवून प्रत्येकी अडीच ते तीन लाख रुपये एवढी रक्कम भरण्यास बजावल्याने महिला भयभीत झाल्या. यासंदर्भात तक्रार करुनही कारवाई न झाल्याने पीडित महिलांनी २३ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभिले आहे. या प्रकरणी पिपरे यांच्यावरील गुन्ह्यात आणखी कलमांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आशिष पिपरेचा भाजपशी संबंध नाही: जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे
आशिष पिपरे हे काँग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झाले. त्यांची पत्नी सोनाली पिपरे ही भाजपची निर्वाचित नगरसेविका आहे. आशिष पिपरे हे पूर्वी भाजपचे पदाधिकारी होते. परंतु आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना कुठल्याही पदावर ठेवले नाही, असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी सांगितले.