गोंडवाना विद्यापीठात १ कोटी ४६ लाखांचा गैरव्यवहार, ४ कर्मचाऱ्यांना अटक

गोंडवाना विद्यापीठात १ कोटी ४६ लाखांचा गैरव्यवहार, ४ कर्मचाऱ्यांना अटक

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : स्थापनेपासून वादग्रस्त ठरलेल्या गोंडवाना विद्यापीठात तब्बल १ कोटी ४६ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वित्त विभागातील लिपिकांनी हा घोटाळा केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. ५) चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

महेशकुमार उसेंडी, अमोल रंगारी, अमित जांभुळे आणि प्रिया पगाडे अशी अटक केलेल्या संशयीत आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागातील या कर्मचाऱ्यांनी १ कोटी ४६ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपासाअंती पोलिसांनी चारही संशयीत आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महेशकुमार उसेंडी हा या गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार आहे. विद्यापीठात विविध प्राधिकरणाचे पदाधिकारी वेगवेगळ्या कामासाठी ये-जा करत असतात. या पदाधिकाऱ्यांना प्रवास भत्ता मिळतो. त्यांच्या प्रवास भत्त्याची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणे अनिवार्य आहे. परंतु महेशकुमार याने या पदाधिकाऱ्यांच्या प्रवास देयकांची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा न करता ती स्वत:च्या खात्यात जमा केली. ही बाब लक्षात येताच प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली.

गोंडवाना विद्यापीठ सतत वादग्रस्त

गोंडवाना विद्यापीठ सतत वादग्रस्त ठरले आहे. आतापर्यंत झालेली प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची भरती तसेच अन्य प्रकरणात सातत्याने या विद्यापीठावर आरोप केले गेले. परंतु सत्ताधाऱ्यांनी घोळ करणाऱ्या मंडळींची पाठराखण केल्याने अनेक प्रकरणे दबून आहेत. आता १ कोटी ४६ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने पुन्हा हे विद्यापीठ चर्चेत आले आहे. या घोटाळ्यात विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत का, याविषयीही तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news