नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आमदार प्रवीण पोटेंचा राजीनामा

Navneet Rana
Navneet Rana

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : भाजप उमेदवार नवनीत राणा अमरावती लोकसभेत पराभूत झाल्या. त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भाजप शहर-जिल्हा अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठविला आहे.

लोकसभा निकाल महत्वाचे मुद्दे

  • नवनीत राणा यांना १९ हजार ७३१ मतांनी पराभव पत्करावा लागला.
  • नवनीत राणांना ५ लाख ६ हजार ५४० मते मिळाली.
  • काँग्रेसचे विजयी उमेदवार बळवंत वानखडे यांना एकूण ५ लाख २६ हजार २७१ मते मिळाली.
  • नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनीच केला होता विरोध.

अमरावती मतदारसंघात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, राजीनामा स्वीकार करावा, अशी विनंती प्रवीण पोटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात केलेली आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यावर सध्या कोणताही निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आलेला नाही.

नवनीत राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपमधून अंतर्गत विरोध होता. उमेदवारीची घोषणा होण्याच्या दोन दिवस आधीच अमरावतीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, अशी विनंती केली होती. फडणवीस यांना भेटलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचा देखील समावेश होता. दरम्यान, आता अमरावतीतील पराभवावर भाजपमध्ये चिंतन सुरू आहे. अशातच प्रवीण पोटे यांनी भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

पोटे-राणा यांच्यात राजकीय वाद

आमदार प्रवीण पोटे आणि नवनीत राणा यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात अनेकदा राजकीय वाद झाला आहे. प्रवीण पोटे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना रवी राणा यांनी त्यांना बालकमंत्री म्हणत एकेरी शब्दात टीका केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रवीण पोटे यांनी आमच्यातील राजकीय मतभेद संपुष्टात आल्याचे सांगत नवनीत राणा यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करू, असे जाहीर केले होते. मात्र तरी देखील नवनीत राणा या अमरावती लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून पराभूत झाल्या. यानंतर आता आमदार पोटे यांनी दिलेला भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा चर्चेत आला आहे.

नवनीत राणा १९,७३१ मतांनी पराभूत

भाजप उमेदवार नवनीत राणा १९ हजार ७३१ मतांनी पराभूत झाल्या आहेत. काँग्रेसचे विजयी उमेदवार बळवंत वानखडे यांना एकूण ५ लाख २६ हजार २७१ मते मिळाली. तर राणा यांना ५ लाख ६ हजार ५४० मते मिळाली. याव्यतिरिक्त प्रमुख उमेदवारांमध्ये प्रहारचे दिनेश बुब यांनी ८५ हजार ३०० मते घेतली. तर वंचित समर्थित रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी १८ हजार ७९३ मते घेतली. अमरावती लोकसभेत एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news