

जयंत निमगडे : गडचिरोली : कोरची तालुक्यातील हितकसा येथील एका इसमाच्या आवारात लागवड केलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुनाराम अलीसाय मडावी (वय ४५) यास अटक केली आहे. पुनाराम मडावी याने आपल्या घराच्या मागील आवारात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (ता. ५) त्याच्या घरी धाड टाकली. यावेळी त्याच्या घरामागील आवारात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.
पंचांसमक्ष मोजणी केली असता तेथे गांजाची १६० झाडे आढळून आली. गांजाची पाने, फुले, बोंडे आणि बिया असा एकूण ३० किलो ३७५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. बाजारात या गांजाची किंमत १५ लाख १८ हजार ७५० रुपये एवढी आहे.
पोलिसांनी हा गांजा तसेच १ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १५ लाख १९ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी पुनाराम मडावी याच्यावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, गोकुलराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौंड, पोलिस अंमलदार रोहित गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, रामदास उईनवार यांनी ही कारवाई केली. कोरचीचे पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख पुढील तपास करीत आहेत.