

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल आणि पैसे चोरल्याच्या संशयातून मित्रांनीच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर नेऊन तरुणाला आधी सिगारेटचे चटके दिले, डोळ्यावर पट्टी बांधून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर निर्वृणपणे गळा चिरून खून केला. मंगळवारी (दि.६) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शकील आरेफ शेख (३०, रा. फुलेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपास चक्रे फिरवत मुख्य आरोपी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज याला अटक केली आहे. तर छावणी पोलिस ठाण्यात त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व अन्य एक अशा एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील हा मजुरी करून उदरनिर्वाह करत असे. तो गेल्या तीन दिवसांपासून घरी गेला नव्हता. तो अनेकदा घराबाहेर राहत असल्याने कुटुंबीयांनी फारशी शोधाशोध केली नाही. मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि कुटुंबीयांना माहिती दिली.
ओली पार्टीफकरून काढला काटा
आरोपींनी या हत्येचा कट आठवडाभरापूर्वीच रचला होता. सिराजने धमकी दिल्यापासूनच वादाची ठिणगी पडली होती. ४ जानेवारीला शकील घराबाहेर पडला, तेव्हापासून आरोपी त्याच्या मागावर होते. त्याला पार्टीचे आमिष दाखवून आरोपींनी जटवाडा डोंगराबर नेले. तिथे दारू आणि नशा करत मओली पार्टीफ रंगली. यावेळी पुन्हा पैशावरून वाद झाला. नशेत असलेल्या आरोपींनी शकीलला सिगारेटचे चटके दिले, मारहाण केली आणि अखेर गळा चिरून तिथून पोबारा केला.
दिवसभर रंगला पोलिसांच्या हद्दीचा वाद
हत्या झालेले ठिकाण हे दौलताबाद आणि छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या सीमेवर होते. सकाळी दौलताबाद पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला. मात्र गुन्हा नेमका कोणत्या ठाण्यात दाखल करायचा, यावरून पोलिसांमध्ये दिवसभर महद्दीचा वादफसुरू झाला. अखेर सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आईला दिली होती धमकी
मृत शकीलचा भाऊ सलमान शेख याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आरोपी सिराजने त्यांच्या आईच्या मोबाईलवर फोन केला होता. ङ्गशकीलने मोबाईल व पैसे घेऊन पलायन केले आहे. तो कुठे आहे सांगा आणि सामान परत द्यायला लावा, अन्यथा त्याचा खून करू, हा अशी धमकी त्याने दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.