

Gadchiroli Elephant Attack Video: मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह एका 35 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. चंदाळा जंगल परिसरात रानटी हत्तीचा जवळून फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 8 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास चंदाळा-मेंढा मार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धनराज पुंजीराम मडावी (वय 35) हे सायकलने जात असताना चंदाळा जंगल परिसरात काही नागरिक रानटी हत्ती पाहण्यासाठी आणि त्याचे मोबाईलवर फोटो काढण्यासाठी जमलेले दिसले.
हत्ती झाडांच्या आड उभा असल्याने अनेक जण सुरक्षित अंतर न ठेवता त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. याचवेळी धनराज यांनीही हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, अचानक हत्ती आक्रमक झाला आणि त्याने धनराज यांच्यावर धाव घेतली. इतर लोकांनी पळून स्वतःचा जीव वाचवला, मात्र धनराज यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. हत्तीच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, हा हत्ती सुमारे 30 रानटी हत्तींच्या कळपापासून वेगळा झाला असून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गुरवाळा, विहीरगाव आणि चंदाळा परिसरात फिरत आहे. या कळपात एक सुळेधारी नर हत्ती (Tusker) असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वन विभागाने नागरिकांना रानटी हत्ती दिसल्यास त्याच्या आसपास गर्दी करू नये, मोबाईलवर फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी जवळ जाऊ नये, वाहनांचे हॉर्न वाजवू नयेत किंवा हत्तीला चिथावणी देणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन केले आहे.
वन विभागाने वेळोवेळी इशारे देऊनही अनेक जण रानटी प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी किंवा सोशल मीडियासाठी फोटो-व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतात. अशा निष्काळजीपणामुळे जीवघेण्या घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.