Nashik News | नाशिक जलमय, नालेसफाईचे पितळ उघडे; विकासकामांचा पहिल्याच पावसात पर्दाफाश

Nashik News | महापालिका प्रशासनाची दिरंगाई : नागरिकांच्या घरांमध्ये शिरले पाणी, ड्रेनेज व्यवस्था कोलमडली
नाशिकला पावसाने झोडपले(छाया-हेमंत घोरपडे)
नाशिकला पावसाने झोडपले(छाया-हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरभर केल्या जात असलेल्या विकासकामांचा पहिल्याच धुवाधार पावसाने पर्दाफाश केला. नव्याने बांधण्यात आलेले बहुतांश ड्रेनेज ओव्हर फ्लो वाहत असल्याने, महापालिका प्रशासनाचा गटारे स्वच्छतेचा दावा पूर्णतः फोल ठरला. याशिवाय, नव्या कोऱ्या सिमेंट रस्त्यांनादेखील तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने, महापालिकेकडून केली जात असलेली कामे सोयीची की गैरसोयीची असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकला पावसाने झोडपले(छाया-हेमंत घोरपडे)
Pune Monsoon Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; अनेक भागांत पाणी साचले, नागरिकांना दिलासा

बुधवारी (दि.८) झालेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. पावसाच्या थैमानासमोर प्रशासनाकडून सुरू असलेल्या विकासकामांचा अजिबातच निभाव लागला नसल्याचे दिसून आले. परिणामी शहरभरात कुठे रस्ते खचल्याचे, तर कुठे पूल पडल्याच्या घटना समोर आल्या.

याशिवाय, विकासकामांमुळे वाहने त्यात अडकून पडल्याचे एक नव्हे तर सुमारे डझनभर प्रकार समोर आले. चोपडा लॉन्स परिसरात स्कूल व्हॅन महापालिकेची घंटागाडी अडकून पडली. गंगापूर रोडवर चारचाकी खड्ड्यात अडकून पडली. सोमेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर पाणी साचल्याने, त्यात सिटी लिंक बंद पडली. सिटी सेंटर मॉल तसेच कार्बन नाका येथे खोदकामामुळे खचलेल्या रस्त्यात ट्रक अडकल्याचे दिसून आले.

दिव्याख्याली अंधार

प्रशासनाने ट्रिमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून सीबीएस ते कॅनडा कॉर्नरपर्यंत काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र, राजीव गांधी भवनसमोरच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उतार दिला गेला नसल्याने, या ठिकाणी पाणी साचले होते. कर्मचाऱ्यांकडून चेंबरचे झाकण काढून पाण्याला वाट मोकळी करून दिली. हे चित्र बघून 'दिव्याखालीच अंधार' असल्याची भावना नाशिककरांनी बोलून दाखविली.

नाशिक जलमय, नालेसफाईचे पितळ उघडे

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांचे पितळ उघडे पाडले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना बुधवार (दि.८) च्या पावसात ड्रेनेज व्यवस्थाही कोलमडून पडल्याने शहरातील शेकडो ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. झाडे उन्मळून पडणे, रस्त्यांवर पाणी साचणे, ड्रेनेज चोकअप होऊन सांडपाणी घरात घुसणे, बेसमेंटमध्ये पाणी भरणे, शॉर्टसर्किट होऊन आग लागणे अशा गंभीर घटना घडल्या.

यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षावरही तक्रारींचा पाऊस कोसळला असून, या तक्रारींचे निराकरण करताना प्रशासनाचीही पळता भुई थोडी झाली. सिंहस्थाच्या नावावर शहरातील २८ महत्त्वाचे रस्ते खोदून ठेवल्याने नाशिककर आधीच कोंडीत सापडले असताना पावसाचे पाणी रस्त्यांवरील खड्ड्यांत साचून अपघाती क्षेत्र बनले. यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली.

रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अनेक ठिकाणी रस्ते खचून त्यात वाहनांची चाकं रूतून बसली. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र शहरभर दिसले. पाणी साचण्याचे आणि घरात शिरण्याचे प्रकार तर शहराच्या कानाकोपऱ्यात घडले. इंदिरानगरमधील जॉगिंग ट्रॅकजवळ सुखदेव शाळेसमोर श्रीराम प्लाझाच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. कॉलेज रोडवरील पितृछाया बंगल्यात दोन फूट पाणी शिरले.

हिरावाडीतील भाऊसाहेब हिरेनगर, पाटील प्रेसेडेन्सीच्या मागील भाग, वासननगर, काळेनगर, डिसूझा कॉलनी, तारवाला नगरमधील स्वामी अपार्टमेंट, सावरकर नगरमधील महारुद्र सोसायटी, गंगापूर रोडवरील संत कबीरनगर आणि आकाशवाणी टॉवर मागील आनंदनगर येथे नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. सातपूरच्या शिवाजीनगरमधील गाजरे हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्येही पाणी शिरले. पाथर्डी फाट्यावरील म्हाडा कॉलनी पुन्हा एकदा पाण्याने भरली.

ड्रेनेज, चेंबर चोकअप

वासननगर, सिडकोतील साईबाबा नगर, सातपूरच्या अशोक नगरमधील अंबिका स्वीटजवळ, गुरुजी हॉस्पिटलच्या मागे आणि पारिजातनगरमधील जयपूर हाउस येथे गटाराचे सांडपाणी घरात शिरल्याने नागरिकांना मनस्ताप झाला.

सिन्नर फाट्याजवळील सीएनजी बस स्टॅन्डजवळ आणि गंगापूर रोडवरील पोलिस हेडकॉर्टर येथे मुख्य रस्त्याचे चेंबर चोकअप झाल्याने रस्तेच बंद झाले. मुंबई नाका पोलिस स्टेशनजवळ पाइपमध्ये कचरा साचल्याने पाणी तुंबले. मेहेर सिग्नलजवळ रस्त्यात खड्डा पडून चेंबरचे झाकण उघडे राहिल्याने नागरिक पडण्याची भीती निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. पंचवटीतील कपालेश्वर मंदिरामागील सारंग अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने अग्रिशमनला पंप लावून पाणी उपसावे लागले

नाशिकला पावसाने झोडपले(छाया-हेमंत घोरपडे)
Vasai heavy rain | सतत पाचव्या दिवशीही वसई विरार मध्ये पावसाचा हाहाकार!

झाडे कोसळून वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे शहरातील होलाराम कॉलनी, वडाळा गावातील म्हाडा घरकुल परिसर, जेलरोडवरील भक्त्तिपूजा अपार्टमेंटमधील पत्र्याच्या शेडवर, विहितगाव सौभाग्यनगर, मखमलाबाद रोडवरील मानकरनगर, चेहडीशिव पंपिंग रोड, तपोवन रोड, वडनेर पाथर्डी रोडवरील सप्तश्रृंगी फार्म हाऊसजवळ, शरणपूर रोड भागात मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

मान्सून टास्क फोर्स हतबल

महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल पावसाने केली. ड्रेनेज चोकअप झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. यासंदर्भातील तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या मान्सून टास्क फोर्सकडे वळविण्यात आल्या. मोठ्या संख्येने आलेल्या तक्रारींचे निराकरण करताना मान्सून टास्क फोर्स हतबल झाल्याचे चित्र दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news