

Desaiganj BJP Leaders Resign
गडचिरोली : काही व्यावसायिकांची इनकमिंग करणाऱ्या भाजपला आज एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. देसाईगंज या व्यापारनगरीचे नगराध्यक्षपद सांभाळणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शालू दंडवते यांनी काँग्रेसमध्ये, तर गडचिरोली जिल्हा भाजप महिला आघाडीच्या महासचिव गीता हिंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला.
गडचिरोली येथे मागील अनेक वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या गीता हिंगे यापूर्वी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष होत्या. सध्या त्या जिल्हा महासचिव आहेत. २०१६ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भाजपकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली होती. परंतु तेव्हा योगिता पिपरे यांना पक्षाने तिकिट दिले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पक्ष आपला विचार नक्की करेल, असे त्यांना वाटत होते.
यंदाही त्यांनी पक्षाकडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता अर्ज केला होता. परंतु भाजपने प्रणोती निंबोरकर यांना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकिट दिले. तेव्हापासून गीता हिंगे नाराज होत्या. अखेर त्यांनी आज माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते प्रा.राजेश कात्रटवार उपस्थित होते.
गडचिरोलीत गीता हिंगे यांनी आज दुपारी भाजपला रामराम ठोकल्यानंतर संध्याकाळी देसाईगंज येथे तेथील माजी नगराध्यक्ष आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शालू दंडवते यांनी विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आ.विजय वडेट्टीवार व आ.रामदास मसराम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनिता नाकतोडे, राजू रासेकर, विकास प्रधान उपस्थ्िात होते.
शालू दंडवते यांनी हलाखीच्या परिस्थितीत भाजपचे काम केले. गोरगरिबांमध्ये सहज मिसळणाऱ्या सामान्य महिला म्हणून त्या पहिल्यांदा देसाईगंजच्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. परंतु यंदाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकिट नाकारुन लता सुंदरकर यांना तिकिट दिल्याने दंडवते नाराज होत्या. अखेर त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मागील आठवड्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(अजित पवार) प्रवेश केला. त्यानंतर आज दोन महिला नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
अलीकडे भाजप व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्षात घेऊन तिकिट देत आहे. गडचिरोली प्रणोती निंबोरकर यांना निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षात घेतले. रस्ते बांधकाम व्यवसायाची त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यानंतर युवक काँग्रेसचे महासचिव अतुल मल्लेलवार यांनाही पक्षप्रवेश देण्यात आला. मल्लेलवार यांचे ट्रॅवल्स व अन्य व्यवसाय आहेत. त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत तिकिट देण्यात येणार आहे. आता पुन्हा एक काँग्रेसचा बडा कंत्राटदार भाजपमध्ये लवकरच एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असताना आणि आर्थिकदृष्ट्या पक्ष व कार्यकर्ते सक्षम असताना दुसऱ्यांची इनकमिंग करण्याच्या पक्षाच्या धोरणामुळे जुने, निष्ठावंत आणि सदैव कार्यरत असणाऱे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नगर परिषद निवडणुकीत या नाराजीचे पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे.