Gadchiroli Municipal Election | गडचिरोली: ३ नगर परिषदांमध्ये ९२ हजार ८६४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
Maharashtra Local Body Elections
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषदांच्या ६८ जागांसाठी निवडणूक होणार असून एकूण ९२ हजार ८६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी नगरपरिषद क्षेत्रात १०५ मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून, निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन नगर परिषदा आहेत. गडचिरोली नगर परिषदेत सर्वाधिक ४३ हजार ५१३ मतदार असून, त्यांच्यासाठी ४६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत एकूण २७ सदस्यांची निवड होणार आहे.
देसाईगंज नगर परिषदेत एकूण २६ हजार ३५२ मतदार असून, ३२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी एकूण २१ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
आरमोरी नगर परिषदेमध्ये २२ हजार ९९९ मतदार आहेत, जे २७ मतदान केंद्रांवर मतदान करतील. आरमोरीसाठी एकूण २० सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.
आरक्षण आणि महिला प्रतिनिधीत्व
या निवडणुकीत महिला प्रतिनिधीत्वावर विशेष भर देण्यात आला आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये निवडून द्यावयाच्या एकूण ६८ सदस्यांपैकी तब्बल ३५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्रवर्गनिहाय राखीव जागांची माहिती: एकूण ६८ जागांपैकी ३१ जागा सर्वसाधारण, १८ जागा नामाप्र, ११ जागा अनुसूचित जाती आणि ८ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
महिला आरक्षणाचा तपशील:
गडचिरोली नगर परिषदेतील २७ पैकी १४ जागा, देसाईगंज नगर परिषदेतील २१ पैकी ११ जागा आणि आरमोरी नगर परिषदेतील २० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये विविध प्रवर्गातील महिलांना संधी मिळाली आहे. गडचिरोलीत सर्वसाधारण गटातील ६ जागा, देसाईगंजमध्ये सर्वसाधारण गटातील ६ जागा आणि आरमोरीमध्ये सर्वसाधारण गटातील ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

