

BJP Candidate Gadchiroli Pranoti Nimborkar Bhandekar
गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, याविषयी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या अंतिम दिवसापर्यंत सस्पेंस कायम ठेवत भाजपने अखेरच्या क्षणी प्रणोती निंबोरकर-भांडेकर यांना नगराध्यक्षपदासाठी एबी फॉर्म दिल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन नगर परिषदा आहेत. देसाईगंज आणि आरमोरी येथे उमेदवार जाहीर करण्यात भाजपला काहीही अडचण नाही, कारण तेथे स्पर्धा नाही, असे तेथील स्थानिक नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच होती. माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रणोती निंबोरकर-भांडेकर व रीना चिचघरे या तिघींची नावे चर्चेत होती आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने जोरदार फिल्डींग लावली होती. भाजपने यासंदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांकडून सर्वेक्षणही केले होते. परंतु तिन्ही उमेदवार सबळ असल्याने कुणीही माघार घेण्यास तयार नव्हत्या.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे हे रीना चिचघरे यांच्या नावासाठी अत्यंत आग्रही होते, तर अन्य नेते प्रणोती निंबोरकर व योगिता पिपरे यांच्यासाठी प्रयत्नशिल होते. तिघांचेही काही समर्थक नेते मुंबईत ठाण मांडून होते. परंतु आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दुपारी सव्वा वाजता आ.कीर्तिकुमार भांगडिया गडचिरोलीत दाखल झाले. यावेळी लिफाफ्याची जुनीच पद्धत वापरत भाजप जिल्हाध्यक्षांनी प्रणोती निंबोरकर यांना ए,बी फॉर्म दिला.
चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदांचे निरीक्षक आहेत. त्यांनीच प्रणोती निंबोरकर यांचा भाजपात प्रवेश करवून घेतला. भांगडिया यांच्याशिवाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे हेदेखील निंबोरकर यांनाच तिकिट मिळावी, या मताचे होते. दुसरीकडे आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी भारतीय स्टेट बँकेतून अधिकारीपदाचा नुकताच राजीनामा दिलेल्या रीना चिचघरे यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाली लावली होती.
परंतु, पक्षश्रेष्ठींनी प्रणोती निंबोरकर यांच्या नावाला पसंती दर्शवत उमेदवारी बहाल केली. एकूणच, भाजपमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांचा गट एकीकडे आणि आमदार नरोटे एकीकडे अशा अत्यंत तणावपूर्ण वातावरणात प्रणोती निंबोरकर यांना उमेदवारी मिळाल्याने आ.डॉ.मिलिंद नरोटे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने गडचिरोलीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. अशावेळी भाजपमधील नाराज पदाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.