

NITI Aayog Delta Ranking Gadchiroli First
गडचिरोली : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे कृषी व जलसंपदा या क्षेत्रातही जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनासह या प्रयत्नांमध्ये सहभागी सर्व घटकांचे कौतुक केले आहे.
आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास तसेच मूलभूत पायाभूत सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांतील ४८ निर्देशांकांच्या आधारे डेल्टा रँकिंग निश्चित केले जाते. निर्धारित कालावधीत या निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांचा त्यासाठी विचार केला जातो. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत गडचिरोलीने देशात प्रथम क्रमांक मिळविला असून, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्ह्यातील विविध विभागांनी समन्वयाने केलेल्या प्रयत्नांमुळे विकासाच्या विविध निर्देशांकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. विशेषतः कृषी व जलसंपदा क्षेत्रातील कामगिरीमुळे गडचिरोलीला या क्षेत्रातही देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
राज्य शासनाची जिल्ह्यातील यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेने आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात एकसंघपणे काम केले. या सांघिक प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी, विविध विभाग, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचे अभिनंदन केले. हे यश भविष्यात अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विकासातील तफावत कमी करणे, तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे तसेच सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे नीती आयोगाने कौतुक केले आहे. गडचिरोलीच्या या कामगिरीबद्दल सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.