

Baburao Madavi Birth Centenary
गडचिरोली: लोकनेते,आदिवासी रत्न बाबूराव मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवोदित आदिवासी साहित्य परिषदेच्या पाचव्या साहित्य संमेलनाचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे करण्यात आले आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि क्रांतिवीर नारायणसिंग उईके विकास समिती, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, एलआयसी रोड, आयटीआय चौक येथे हे संमेलन होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाची सुरुवात सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, आयटीआय चौक ते संमेलनस्थळापर्यंत ही दिंडी काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहउद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. संमेलनाध्यक्षपदी पालघर जिल्ह्यातील वसई येथील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. सखाराम डाखोरे भूषविणार आहेत.
यावेळी माजी मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश बाबुराव मडावी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ आदिवासी कवयित्री कुसुमताई आलाम बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात लोकनेते बाबुरावजी मडावी यांच्या सामाजिक, साहित्यिक, राजकीय आणि लोकउपयोगी कार्यकर्तृत्वावर विचारमंथन होईल. दुसऱ्या सत्रात आदिवासींच्या मातृभाषा, मौखिक साहित्याचे संवर्धन आणि चिकित्सा या विषयांवर साहित्यिक व अभ्यासक विचार मांडतील. या सत्रांच्या अध्यक्षस्थानी अनुक्रमे डॉ. संजया लोहकरे आणि प्रा. डॉ. राम वासेकर राहणार आहेत.
दुपारी ४ ते ६ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नीलकांत कुलसंगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून, विविध कवी आपल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत.
आदिवासी समाजाचे साहित्य, संस्कृती, मातृभाषा आणि वैचारिक परंपरेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच लोकनेते बाबुरावजी मडावी यांच्या कार्याचा गौरव करणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. साहित्यिक, अभ्यासक, आदिवासी बांधव आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला कवयित्री कुसुमताई आलाम, डॉ. प्रवीण किलनाके, आशा वेलादी, निशा गेडाम, मंजू आत्राम, प्रमिला रामटेके, सुनीता उसेंडी, प्रियदर्शन मडावी आणि प्रा. अनिल होळी आदी उपस्थित होते.