

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स कंपनीद्वारे संचालित एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील शाळेत शिक्षक असलेल्या दाम्पत्याने नागपुरातील रेवतीनगर येथील घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी(ता.८) सकाळी उघडकीस आली. मनिष प्रल्हाद गणवीर(३८) व सोनाली मनिष गणवीर(३५) अशी मृतांची नावे आहेत.
सोनाली ही मूळची गडचिरोलीनजीकच्या नवेगाव(मुरखळा) येथील, तर मनिष हा नागपुरातील रहिवासी होता, सोनालीचे माहेरचे आडनाव राजगुरु असे आहे. सोनाली आणि मनिष या दोघांचेही यापूर्वी दुसऱ्या व्यक्तींशी लग्न झाले होते. मात्र, सोनालीने आपल्या पतीशी आणि मनिषने आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून दोघेही हेडरी येथील लॉयड्स मेटल्स कंपनीद्वारे संचालित लॉयड्स राज विद्या निकेतन शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून रुजू झाले. यावर्षी शाळा व्यवस्थापनाने मनिषला पदव्युतर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली होती. एकाच ठिकाणी नोकरी असल्याने दोघांनीही लग्नास पसंती दिली. त्यानंतर यंदा ३१ ऑगस्टला त्यांनी कोर्ट मॅरेज केलं.
कुटुंबीय गेले होते बोधगयेला
मनिष गणवीर याच्या वडिलांचे घर नागपुरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत रेवतीनगर येथे आहे. अधूनमधून दोघेही तेथे जात असत. मनिषचे कुटुंबीय बोधगयेला गेले होते. अशातच दिवाळीच्या सुट्या असल्याने मनिष आणि सोनाली नागपुरातील घरी गेले. शनिवारी(ता.७) दुपारी त्यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांनी ऐकले. परंतु अर्धा तासातच आवाज बंद झाला. पती-पत्नीमधील भांडण समजून शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
रविवारी(ता.८) सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास मनिषचा जयताळा येथील नातेवाईक प्रशिक लांडगे(२६) त्याला भेटण्यासाठी घरी गेला. परंतु दार आतून बंद असल्याने प्रशिकने अनेकदा दार ठोठावून बघितला. मोबाईलवरही संपर्क साधला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी प्रशिकने टिनाच्या शेडवरुन दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश करुन खिडकीतून बेडरुमध्ये डोकावून पाहिले असता मनिष आणि सोनाली दोघेही पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्याने शेजारी आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघेही चांगले आणि मेहनती शिक्षक होते. शाळा व्यवस्थापनाकडे त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. असे असताना दोघांनी असा निर्णय का घेतला याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत.