

गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशात समता, बंधूता आणि एकता नांदत आहे. जगातील चौथी सर्वांत मोठी भारतीय अर्थव्यवस्था संविधामुळेच निर्माण झाली आहे. परंतु आता माओवाद्यांनी हातातली शस्त्रे खाली ठेवल्यानंतर काही लोक डोक्यातील शस्त्राचा वापर करुन लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करताहेत, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोंडवाना विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती जिष्णूदेव वर्मा, तर प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध विद्या शाखांमधून पीएचडी मिळविणाऱ्या १५० आणि सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. शिवाय 'मानवमुक्तीचा दीपस्तंभ' या बाबासाहेब आंबेडकरांवरील गौरवग्रंथाचं प्रकाशनही अतिथींच्या हस्ते करण्यात आलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ग्रामर ऑफ अनार्की’ अर्थात ‘अराजकतेचे व्याकरण’ या सिद्धांतातून लोकशाहीचा खरा शत्रू कोण, हे सांगितलं. परंतु काही लोक संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा विचार पेरत आहेत. आता माओवाद संपला. उरलेल्या माओवाद्यांनीही शस्त्रे टाकून संवैधानिक मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला. तरीही काही जण डोक्यातील शस्त्राने लोकशाही खिळखिळी करण्याचं षडयंत्र रचत आहेत. बाबासाहेबांचा विचार विद्यापीठांमधून शिकवला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गोंडवाना विद्यापीठानं नवी व्यवस्था उभी केली. हे विद्यापीठ मानव संसाधनात मोलाचा वाटा उचलत आहे. भविष्यात सेमिकंडक्टर,एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे जीवन बदलणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठांनी उत्तम मानवसंसाधन उभं करणं आवश्यक आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गोंडवाना विद्यापीठानं आस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठाशी करार केल्यानं खनिकर्म क्षेत्रात चांगले विद्यार्थी घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
समाजात सकारात्मक बदल घडविणे हा शिक्षणाचा उद्देश: राज्यपाल जिष्णूदेव वर्मा
शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी मिळविणे किंवा वैयक्तिक प्रगती साधणे नसून समाजात जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना मानवी संवेदना, सहानुभूती आणि नैतिक मूल्यांची जोड आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता समस्यांवर उपाय शोधू शकते; मात्र सहानुभूतीशिवाय ती निर्दयी ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी याप्रसंगी केले.
गडचिरोलीत सुरु झालेल्या आणि भविष्यातील उद्योगांच्या अनुषंगानं गोंडवाना विद्यापीठानं विविध अभ्यासक्रम सुरु केल्याचं कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी सांगितलं. याप्रसंगी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण उपस्थित होते.