

Gadchiroli Municipal Election
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यास या शहराला स्मार्ट सिटी बनवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार अशोक नेते, आ.कीर्तिकुमार भांगडिया, माजी आमदार डॉ.देवराव होळी, डॉ.नामदेव उसेंडी, प्रकाश पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, बाबूराव कोहळे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर, देसाईगंजच्या लता सुंदरकर व आरमोरीचे रुपेश पुणेकर उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वी गडचिरोलीत आठशे कोटी रुपयांची कामं केली. यापुढे शहराच्या विकासाचा आराखडा तयार करुन गोरगरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करु. वाढत्या लोकसंख्येनुसार गडचिरोली शहरासाठी १३० कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मान्यता देण्याचा मानस असून, अतिक्रमण नियमित करुन प्रत्येकाला घर बांधून देऊ. गडचिरोली शहरात आऊटर रिंग रोड निर्माण करुन लवकरच येथे विमानतळ निर्मितीचं काम सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं.
गडचिरोली जिल्ह्यात ३ लाख कोटींची गुंतवणूक येत असून, जल, जंगल व जमिनीचे रक्षण करुन भूमिपूत्रांना रोजगार देण्यावर भर राहील. एकूणच गडचिरोलीचा विकास होणार असून, हा जिल्हा दक्षिण भारताचं प्रवेशद्वार बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी भूमिगट गटार योजना आणि घनकचरा व्यवस्थापनाची योजना राबवू, असेही आश्वासन दिले.
देसाईगंज,आरमोरीबाबत काहीच वक्तव्य नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या सभेत गडचिरोलीसह देसाईगंज व आरमोरी येथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि तेथील भाजपचे नेतेही मंचावर उपस्थित होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ गडचिरोली शहराच्या विकासाबाबत आश्वासन दिलं. आरमोरी आणि देसाईगंजच्या बाबतीत मुख्यमंत्री काहीच बोलले नाही, याची कुजबूज आरमोरी आणि देसाईगंज येथून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.