गडचिरोली : शिवराजपूर जंगलात फिरत असलेल्या जखमी वाघाला वनाधिकाऱ्यांनी केले जेरबंद | पुढारी

गडचिरोली : शिवराजपूर जंगलात फिरत असलेल्या जखमी वाघाला वनाधिकाऱ्यांनी केले जेरबंद

गडचिरोली : पुढारी ऑनलाईन डेस्क : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर परिसरातील जंगलात जखमी अवस्थेत फिरत असलेल्या टी-२३ या वाघाला गुरुवारी (ता. ८) वनाधिकाऱ्यांनी बेशुद्ध करुन जेरबंद केले. या वाघाला नागपुरातील गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या –

५ फेब्रुवारीला रात्री वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांना एक वाघ जखमी अवस्थेत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवराजपूर-उसेगाव रस्त्यावर पाळत ठेवली असता एक वाघ लंगडत चालत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी त्या वाघावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवण्यात आली. या वाघाच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने तो लंगडत चालत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील चमूला पाचारण करण्यात आले. दोन-तीन दिवसांपासून जखमी वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. गुरुवारी शिवराजपूरनजीकच्या जंगलात तो आढळून येताच डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला ताब्यात घेतले.

हा वाघ ४ ते ५ वर्षे वयाचा असून, त्याने कोणत्याही व्यक्तीवर आजवर हल्ला केला नाही. त्याला गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात पाठवून आठ-दहा दिवस त्याच्यावर उपचार केले जातील आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button